गलवान खोऱ्यात चिनी सैन्यच तणाव वाढवत आहे, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mike-pompeo-us

चीन हा धोकेबाज देश असल्याचं हिंदुस्थान वारंवार सांगत होता. हिंदुस्थान सांगत असलेली ही बाब आता इतर देशांनाही चांगलीच लक्षात आली आहे. गलवान खोऱ्यात हिंदुस्थानचे 20 सैनिक शहीद झाले आहेत. चिनी जवानांनी दगाबाजी करत त्यांची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. हिंदुस्थान आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाबाबत बोलताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चिनी सैन्यच सीमेवर हा तणाव वाढवत असल्याचं म्हटलं आहे.

पॉम्पिओ यांनी शुक्रवारी चीनचे राजदूत यांग जियाची यांच्याशी हवाईमध्ये बातचीत केली. जियाची हे हिंदुस्थान आणि चीनमधला तणाव कमी व्हावा यासाठीच्या संवाद प्रक्रियेमधील मुख्य व्यक्ती आहेत. या भेटीनंतर पॉम्पिओ यांनी चीनवर कडवट शब्दात टीका केली. नाटोसारख्या संस्थांच्या मदतीने जगाचे स्वातंत्र्य अबाधित राहिले, मात्र कम्युनिस्ट पक्ष हा जगाला जुन्या काळात लोटण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जगावर नवे नियम थोपवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप पॉम्पिओ यांनी केला आहे. चिनी सैन्य पिपल्स लिबरेशन आर्मीने हिंदुस्थानसोबतच्या तणावाला खतपाणी घातले आहे असं पॉम्पिओ म्हणाले आहेत.

दक्षिण चिनी सागरामध्ये सैनिकी हालचाली वाढवणं, अवैधरित्या तिथले भाग बळकावण्याचा प्रयत्न करणं आणि समुद्रामार्गे होणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याची धमकी देण्याचं कामचीन सातत्याने करत आल्याचंही पॉम्पिओ यांनी म्हटलं आहे. चीन त्याच्या शेजारी राष्ट्राशी दुष्टपणे वागत असून जगासोबत चिनी खोटारडेपणा करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. चीनने कोरोना विषाणूबाबत जगासोबत खोटारडेपणा केला ज्यामुळे हा आजार जगभर फैलावला असं पॉम्पिओ यांनी म्हटलंय. जागतिक अर्थव्यवस्था या आजारामुळे उध्वस्त झाली आहे, तरीही चीनने विषाणूच्या नमुन्यापर्यंत पोहोचण्यास मदत केली नाही असा आरोपही पॉम्पिओ यांनी केला आहे.