चीनला हरवण्यासाठी चिनी वस्तूंचा बहिष्कार करणे आवश्यक – बाबा रामदेव

555

हिंदुस्थान आणि चीनमध्ये महिन्याभरापासून लडाख सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. अशातच आता देशभरात चीनला बुलेटसोबत वॉल्लेटनेही उत्तर द्यावे असे बोलले जात आहे. यावरूनच योगगुरू रामदेव बाबा यांनीही विधान केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ‘हिंदुस्थानची सीमेची सुरक्षा करण्यासाठी आपलं सैन्य पूर्णपणे सक्षम आहे. चीनवर मात करण्यासाठी शस्त्रापेक्षा चिनी वस्तूंवर बहिष्कार करणे आवश्यक आहे. कारण चीन आपल्या देशातून 20 ते 30 लाख कोटींचा व्यवसाय करतो.’ ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

बाबा रामदेव पुढे म्हणले की, ‘चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी मोठे संकल्प करावे लागणार. मी मागील तीन दशकापासून चीनच्या कोणत्याही उत्पादनाचा वापर केलेला नाही. चीनला जर धडा शिकवायचा असेल तर प्रत्येक हिंदुस्थानीने चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा संकल्प केला पाहिजे. हाच चीनला धडा शिकवण्याचा सर्वात योग्य मार्ग आहे.’ ते म्हणाले, ‘जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून चीन हिंदुस्थान-चिनी भाऊ-भाऊ या घोषणा देऊन आपली लूट करीत आहे. अशा परिस्थितीत केवळ चिनी उत्पादनांवर बहिष्कारच नाही तर चीनप्रती द्वेषाचे वातावरण देखील निर्माण करावे लागेल.’

चीनमधून आयात-निर्यातीच्या प्रश्नावर बाबा रामदेव म्हणाले की, चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याबरोबरच आपण स्वदेशी वस्तूंसाठीही धोरण तयार केले पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घटनात्मक आणि आंतरराष्ट्रीय करारांशी बांधील आहेत. राजकीयदृष्ट्या जे करायला हवे ते पंतप्रधान करत आहेत. परंतु हिंदुस्थानाला चीनचा पर्याय बनवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक, खेळणीचे उत्पादन केंद्र देशात तयार केले जावे आणि करात सूट देण्यात यावी, असं ते म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या