देशात विषाणूचा विळखा सैल होतोय, कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 10 टक्क्यांहून कमी

देशात कोरोना विषाणूचा विळखा सैल होत चालला आहे. एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्याचवेळी ऑक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. सध्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच संसर्गही ओसरला आहे. मागील सलग तीन दिवसांत कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांच्या खाली नोंद झाला आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्याच्या घडीला देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 77 लाखांच्या पुढे गेला आहे. या तुलनेत कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ 9.29 टक्के म्हणजेच 7 लाख 15 हजार 812 इतकी आहे. देशभरात केंद्र सरकारबरोबरच राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी विषाणूला ठेचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला उतरती कळा लागली आहे. गुरुवारी देशातील कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 3.8 टक्के इतका नोंद झाला. दिवसभरात 55,389 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 702 जणांचा मृत्यू झाला.

राष्ट्रीय रिकव्हरी रेट 89.20 टक्क्यांवर

गुरुवारी दिवसभरात 79,415 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 68 लाख 74 हजार 518 वर पोहोचली आहे, तर राष्ट्रीय रिकव्हरी रेट 89.20 टक्क्यांवर सुधारला आहे. अॅक्टिव्ह रुग्ण आणि कोरोनामुक्तांची संख्या यातील अंतर वाढत चालले आहे. ऑक्टिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या 61 लाख 58 हजार 706 ने अधिक आहे.

मृत्युदर 1.51 टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर

इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत सतत घट होत आहे. तसेच विषाणूचा मृत्युदरही जगात सर्वात कमी म्हणजेच 1.51 टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत मृत्यूदरावर नियंत्रण मिळवण्यात देशातील आरोग्य यंत्रणेला चांगले यश मिळाले आहे, असे केंद्रीय मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या