देशात कोरोनाचा विस्फोट, अवघ्या 12 दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या होतेय दुप्पट

देशात सध्या कोरोनाचा विस्पह्ट झाला असून रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी अवघ्या बारा दिवसांवर आला आहे. याआधी आठ टक्के दराने रुग्णवाढ होत होती, ती आता 16.69 टक्क्यांवर पोहचली आहे. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 18 लाखांहून अधिक झाला आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दहा राज्यांतील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्याने देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आज देशभरात 2 लाख 61 हजार 500 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 1501 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने समोर आलेल्या रुग्णांपैकी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, तामीळनाडू आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये 78 टक्के रुग्ण आहेत. तसेच महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, दादरा, नगरहवेली, दमण, दिव, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम, मिझोराम, मणिपूर, लक्षद्वीप, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

छत्तीसगडमध्ये रुग्णवाढ जास्त

सध्या देशात साप्ताहिक रुग्णवाढीचा दर छत्तीसगडमध्ये सर्वाधिक 31 टक्के असून गोव्यात 24 टक्के एवढा आहे. तर देशाच्या साप्ताहिक रुग्णवाढीचा दर 3 टक्क्यांवरून 13 टक्क्यांवर पोहचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या