आयपीएलचे टायमिंग चुकले! वाढत्या कोरोनाचा फटका

गेल्या काही दिवसांमध्ये हिंदुस्थानात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. एकीकडे देशातील सर्वसामान्य नागरिक कोरोनाचा अडथळा पार करीत जगण्यासाठी संघर्ष करत असतानाच दुसरीकडे मात्र बीसीसीआयला आपली तिजोरी भरायची आहे. हिंदुस्थानात 9 एप्रिलपासून आयपीएल ही टी-20 स्पर्धा रंगणार आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता या स्पर्धेच्या आयोजनाचे टायमिंग चुकले असे म्हटले तरी यावेळी वावगे ठरणार नाही. बीसीसीआयने ही स्पर्धा मागील वर्षाप्रमाणे पुढे ढकलायला हवी होती किंवा पुन्हा एकदा ही स्पर्धा यूएईला खेळवायला हवी होती. असा सूर यावेळी सर्वच स्तरांतून निघू लागला आहे.

n मागील आयपीएलप्रमाणे याही मोसमात स्पर्धा सुरू होण्याआधी खेळाडू, ग्राऊंडस्टाफ, क्रू मेंबर्स यांना कोरोना संसर्ग झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डॅनियल सॅम्स याच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आला. याआधी वानखेडे स्टेडियममधील ग्राऊंड स्टाफ, प्लंबर यांच्यासह किरण मोरे, अक्षर पटेल, देवदत्त पड्डीकल, नितीश राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र यानंतरही बीसीसीआयला ही स्पर्धा यशस्वी होणार याची खात्री आहे.

  • मागील वर्षी कोरोनाची पहिली लाट हिंदुस्थानात आली. जवळपास डिसेंबर महिन्यापर्यंत याचे पडसाद उमटताना दिसले. त्यानंतर या वर्षी सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग कमी झाला. जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली. याच कालावधीत इंग्लंडचा संघ हिंदुस्थानात कसोटी, वन डे व टी-20 मालिका खेळण्यासाठी आला. या तिन्ही मालिका यशस्वी पार पडल्या. त्यामुळे एप्रिल ते मे या कालावधीत आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआयचा विश्वास आणखीनच उंचावला.

बीसीसीआयने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे होते

  • मार्च महिन्याच्या उत्तरार्धात हिंदुस्थानात कोरोना वाढू लागल्यानंतर बीसीसीआयने ही स्पर्धा गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा यूएईला खेळवण्यासाठी पाऊल उचलायला हवे होते. या स्पर्धेशी संबंधित व्यक्तींनी याबाबत सूचनाही दिली होती.
  • वाढत्या कोरोनामुळे आयपीएल लढतीदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार नाही तर सहा ठिकाणी लढती खेळवण्याची गरज काय होती? दोन ते तीन ठिकाणी या लढती होऊ शकल्या असत्या.
  • आरोग्याशी निगडित नियम तयार करण्यासाठी उशीर झाला. तसेच परदेशी क्रिकेटपटूंच्या व्हिसाच्या प्रकियेलाही विलंब झाला.
आपली प्रतिक्रिया द्या