
अभिषेक शर्माच्या 75 धावांच्या घणाघातानंतर कोलमडलेल्या हिंदुस्थानी फलंदाजीला बांगलादेशने 168 धावांत रोखण्याची करामात दाखवली. पण फिरकीवीर कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी बांगलादेशी फलंदाजांना 127 धावांत गुंडाळले आणि आशिया कपमध्ये सलग पाचव्या विजयासह स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
हिंदुस्थानच्या 169 धावांच्या आव्हानाचा बांगलादेशी पाठलाग करण्याचा प्रयत्न करतील असे वाटत होते. पण सलामीवीर सैफ हसनच्या एकाकी झुंजीला एकाही फलंदाजाची साथ लाभल्यामुळे तो संघाला विजयासमीप नेऊ शकला नाही. सैफने परवेझ हसनसह (21) दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची सर्वोत्तम भागी केली. मात्र त्यानंतर त्याने 18 व्या षटकापर्यंत हिंदुस्थानी संघाला गॅसवर ठेवले. शेवटच्या तीन षटकांत 54 धावांची गरज असताना सैफची झुंजार खेळी 69 धावांवर संपली. त्यानंतर बांगलादेशचा डाव 127 धावांवर आटोपला. गेल्या सामन्यात 9 विकेट टिपणाऱया कुलदीपने 18 धावांत 3 विकेट टिपले. तसेच कुलदीपसह वरुण, अक्षर आणि तिलक वर्माने 7 विकेट मिळवले. बुमरानेही 18 धावांत 2 विकेट टिपल्या.
54 चेंडूंत फक्त 56 धावा
11 षटकांत 112 धावा काढणाऱया हिंदुस्थानच्या डावाला 12 षटकापासून नजर लागली. पहिल्याच चेंडूवर अभिषेकचा झंझावात थांबला आणि पुढे धावांचा वेगही थांबला. एकटय़ा हार्दिक पंडय़ाचा (38) अपवाद वगळता मधली फळी कोसळली. कर्णधार सूर्यकुमार यादव (5), तिलक वर्मा (5) आणि अक्षर पटेल (10) यांनीही घोर निराशा केल्यामुळे शेवटच्या नऊ षटकांत संघाच्या धावसंख्येत केवळ 56 धावांची भर पडली. विशेष म्हणजे या नऊ षटकांत बांगलादेशी गोलंदाज इतके भेदक होते की, त्यांनी एक षटकार आणि चार चौकारच हिंदुस्थानी फलंदाजांना दिले. परिणामतः हिंदुस्थानचा डाव 6 बाद 168 धावांवर अडखळला.
अभिषेकची तुफानी फटकेबाजी
आपल्या उत्तुंग फटक्यांनी गोलंदाजांना सैरभैर करणाऱया अभिषेक शर्माने आज तशीच वेळ बांगलादेशी गोलंदाजांवर आणली. पहिल्या तीन षटकांत अभिषेक आणि शुभमन गिलला बांगलादेशी गोलंदाजांनी अक्षरशः बांधून ठेवले होते. या तीन षटकांत फलकावर केवळ 17 धावा लागल्या होत्या, मात्र चौथ्या षटकात दोघे नासुम अहमदवर तुटून पडले आणि त्याला 21 धावा चोपून काढल्या. मग पुढच्या दोन्ही षटकांत 17-17 धावा करत त्याने सत्तरी गाठली. 76 धावांवर ही जोडी फुटल्यानंतर हिंदुस्थानची धावगती मंदावली. गिल (29) बाद झाल्यानंतर शिवम दुबेही (2) लवकर बाद झाला. दुसऱया बाजूने अभिषेकने आपली षटकारबाजी कायम ठेवत 37 चेंडूंत 75 धावा ठोकताना 5 षटकार आणि 6 चौकारांचा पाऊस पाडत संघालाही शंभरी गाठून दिली.