
कोरोनाच्या महामारीने अवघे जग हतबल झाले आहे. मात्र हिंदुस्थान आणि चीनसारखे आशियाई देश जिगरीने या संकटाशी लढत आहेत. ही जिद्द पाहता भविष्यात हिंदुस्थान आर्थिक विकासदरातही लवकरच भरारी घेऊ शकेल, असे आशादायक मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केले आहे. कोरोनाने अमेरिकेसह युरोपातील प्रगत देशांचे कंबरडे मोडलेले आहे. त्यामुळे येत्या वर्षांत या देशांना आपला आर्थिक विकासदर वाढवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागतील. त्या मानाने कोरोनाचे संकट ओळखून स्वतःला सावरणाऱया उपाययोजना करणाऱया हिंदुस्थान, चीन, जपान आणि दक्षिण कोरियासारख्या आशियाई देशांना मात्र विकासदरात सुधारणा करण्याची संधी अधिक आहेत, असे आयएमएफने म्हटले आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे जगातील विकसित आणि विकसनशील देशांची अर्थव्यवस्था पार कोलमडण्याचे संकेत आहेत. त्यामुळे प्रगत देशांत आर्थिक विकासदर वाढण्याच्या संधी फारच कमी आहेत. त्या मानाने हिंदुस्थानसारखे आशियाई देश ज्या तत्परतेने कोरोनाविरुद्धचा लढा लढत आहेत ते पाहता भविष्यात आर्थिक विकासदरातही चीन आणि हिंदुस्थान हे देश पॉसिटीव्ह विकासदर गाठू शकतात. चीनचा विकास दर 1.2 टक्क्यांनी तर हिंदुस्थानचा विकासदर 1.9 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आयएमएफने वर्तवला आहे. या अंदाजानुसार चीनचा विकासदर 2021 मध्ये 9.2 टक्के तर हिंदुस्थानचा विकासदर 7.2 असेल असे भविष्य वर्तविण्यात आले आहे. हिंदुस्थानसह आशियाई देशांची जिद्द वाखाणण्याजोगी जीवघेण्या कोरोनाविरुद्ध हिंदुस्थानसह काही आशियाई देशांनी जी जिद्द आणि जिगर दाखवलीय ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे, असे कौतुकाचे उद्गार आयएमएफचे आशिया आणि पॅसिफिक विभागाचे संचालक चँग याँग री यांनी काढले आहेत. री म्हणतात, आशियाई देशांचा हा लढा त्यांना आर्थिक विकासदरात वृद्धी करण्यासाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. विकसित देश कोरोनाविरुद्ध लढताना हताश झालेले असताना हिंदुस्थानने या महामारीविरुद्ध लढताना दाखवलेली जिद्द स्तुत्य आणि अन्य देशांना धडा देणारी आहे. त्यामुळे या महामारीच्या प्रकोपानंतर हिंदुस्थान नक्कीच आर्थिक विकासदरात भरारी घेऊ शकेल असा विश्वासही री यांनी व्यक्त केला.






















































