देशात उष्णतेचा कहर; पुढील 7 दिवस ‘हीटवेव्ह’चा इशारा, हवामान विभागाचा सतर्कतेचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना पुढील सात दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. यासोबतच नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये विशेषतः खुल्या जागेत काम करणारे, असंघटित क्षेत्र आणि गिग कामगार यांच्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत सूचना जाहीर केल्या आहे. यामध्ये थेट उन्हात दीर्घकाळ राहणे टाळणे, जास्त श्रमाचे काम टाळणे, पुरेसे पाणी पिणे आणि सावलीत विश्रांती घेणे यावर भर देण्यात आला आहे.

प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांनीही तयारीत राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिण्याचे पाणी, निवारा आणि आपत्कालीन संच उपलब्ध ठेवणे आवश्यक असून, छत्री, डोक्यावर आच्छादन, टॉवेल, हातपंखा तसेच इलेक्ट्रोलाइट किंवा ग्लुकोज यांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उष्णतेमुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांमध्ये डीहाड्रेशन, क्रॅम्प्स, थकवा आणि उष्माघात यांचा समावेश होतो.

सध्या उत्तर-पश्चिम, मध्य आणि द्वीपकल्पीय हिंदुस्थानातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे शनिवारी 47.4 अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवण्यात आले. अनेक भागांमध्ये तापमान हे सरासरीपेक्षा 5 अंश किंवा त्याहून अधिक वाढलेले दिसून येत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील सात दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील विदर्भ भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच केरळ आणि माहे या दक्षिणेकडील भागांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

किनारी राज्यांमध्ये—ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश—येथे उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर हिंदुस्थानातील मैदानांमध्ये रात्रीही उष्णता कायम राहण्याची शक्यता असून त्यामुळे नागरिकांवरील उष्णतेचा ताण वाढू शकतो.

एखाद्या प्रदेशातील उन्हाळ्यातील नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त तापमानाचा होतं तेव्हा उष्णतेची लाट येते असे म्हणतात. साधारणपणे मार्च ते जूनदरम्यान ही परिस्थिती निर्माण होते, काही वेळा जुलैपर्यंतही ती टिकू शकते. या अत्यंत उष्णतेमुळे मानवी शरीरावर ताण येऊन गंभीर परिणाम, अगदी मृत्यूही होऊ शकतो.

हवामान विभागाच्या निकषांनुसार मैदानी भागात 40 अंश किंवा त्याहून अधिक, तर डोंगराळ भागात 30 अंश किंवा त्याहून अधिक तापमान असल्यास उष्णतेची लाट मानली जाते. सामान्य तापमानापेक्षा 4.5 ते 6.4 अंशांनी वाढ झाल्यास ‘उष्णतेची लाट’, तर 6.4 अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास ‘तीव्र उष्णतेची लाट’ घोषित केली जाते.

तसेच, प्रत्यक्ष कमाल तापमान 45 अंशांपेक्षा जास्त असल्यास उष्णतेची लाट, तर 47 अंशांपेक्षा जास्त असल्यास तीव्र उष्णतेची लाट मानली जाते. एखाद्या हवामान विभागीय उपविभागातील किमान दोन केंद्रांमध्ये सलग दोन दिवस हे निकष पूर्ण झाल्यास दुसऱ्या दिवशी उष्णतेची लाट घोषित केली जाते.

किनारी भागांमध्ये मात्र तापमान सामान्यपेक्षा 4.5 अंशांनी अधिक आणि प्रत्यक्ष तापमान 37 अंश किंवा त्याहून अधिक असल्यासच उष्णतेची लाट घोषित केली जाते.

जगभरात उष्णतेची लाट घोषित करण्यासाठी वेगवेगळे निकष वापरले जातात. काही ठिकाणी तापमान आणि आर्द्रतेच्या संयोगावर आधारित ‘हीट इंडेक्स’चा वापर केला जातो, तर काही देशांमध्ये अत्यंत तापमानाच्या टक्केवारीनुसार ही व्याख्या केली जाते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.