
मनावर ब्रेक उत्तम ब्रेक….नजर हटी दुर्घटना घटी….वेग मर्यादा ताशी 80 किमी….पुढे अपघातप्रवण क्षेत्र आहे…असे राज्यातील महामार्गावर जागोजागी बोर्ड लावले आहेत. मात्र तरीही या बोर्डकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे मागील तीन वर्षांत राज्यातील महामार्गावरील अपघातात तब्बल 37 हजार 501 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
राज्यातील महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या काळात राज्य सरकारच्या वतीने रस्ता सुरक्षा महिना पाळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील रस्ते अपघातांची माहिती घेतली तेव्हा धक्कादायक आकडेवारी हाती आली.
राज्यातील महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी महामार्ग पोलीस व वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी केली जाते. बेफाम वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी कारवाईचा बगडा उगारला जातो. त्यामुळे मागील तीन वर्षांत अपघाताचे प्रमाण दहा टक्क्यांनी कमी झाले आहे. पण तरीही अपघातांचा धोका आहेच. त्यामुळे राज्यातील अपघात कमी करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पुढाकार घेतला असून महामार्ग तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनचालकांमध्ये जनजागृतीचे काम सुरू आहे. मागील वर्षात राज्यात 25 हजार 456 अपघात झाले. या अपघातात 37 हजार 501 लोकांना जीव गमवावा लागला तर 53 हजार 422 लोक गंभीररीत्या जखमी झाले.
कारवाई दंडाची रक्कम
2018 209 कोटी 24 लाख 82 हजार रु.
2019 448 कोटी 77 लाख 31 हजार 467
2020 597 कोटी 92 लाख 93 हजार रु.
कोटय़वधी रुपयांचा दंड
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी बेफाम मोटर चालकांवर वेळोवेळी दंडात्मक कारवाई होते. पण तरीही वाहतुकीचे नियम मोडणाऱयांची संख्या काही कमी होत नाही. नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱयांकडून मागील वर्षात तब्बल 697 कोटी 92 लाख 93 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ब्लॅकस्पॉट कमी
अपघातप्रवण क्षेत्रांना ब्लॅकस्पॉट म्हणून ओळखण्यात येतात. राज्यात 2014 ते 2017 या काळात 1 हजार 324 ब्लॅकस्पॉट होते. राज्य सरकारने योजलेल्या उपाययोजनांमुळे पण आता राज्यात ब्लॅकस्पॉटची संख्या कमी झाली आहे. सध्याच्या घडीला 1 हजार 77 ब्लॅकस्पॉट आहेत.
तीन वर्षांतील अपघातांची आकडेवारी
वर्ष– अपघात– मृत्यू
2018 12हजार 98 13हजार261
2019 11हजार787 12हजार788
2020 10हजार646 11 हजार 452




























































