हिंदुस्थानला नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात महापूर, दुष्काळ, अनियमित पाऊस, प्रचंड उकाडा आणि कडाक्याची थंडी अशा भयंकर नैसर्गिक आपत्तींचे धोके वर्षागणिक वाढत असल्याचा इशारा पवई येथील आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांनी दिला आहे. या नैसर्गिक आपत्तींचा परिणाम कृषी क्षेत्रावर होत असून मातीचा कस कमी झाल्याने देशातील शेतकऱयांचेही नुकसान होत आहे असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. विशेषकरून महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, तेलंगणा आणि पूर्वोत्तर राज्यांना हा धोका अधिक असल्याचे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.

1991 ते 2000 आणि 2001 ते 2010 या दोन दशकांमध्ये हिंदुस्थानमधील भौगोलिक बदलांचा अभ्यास आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी केला. त्यासाठी हवामान खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीचा आधार त्यांनी घेतला. त्याआधारे त्यांनी बनवलेला अहवाल नुकताच ‘एन्व्हायर्नमेंट रिसर्च लेटर्स’मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात नैसर्गिक आपत्तींबद्दल इशारा देतानाच देशातील सामाजिक सुरक्षा वाढली असल्याबद्दल समाधानही व्यक्त करण्यात आले आहे.

आयआयटी मुंबईचे शास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल एच., एन्व्हायर्नमेंट सायन्स ऍण्ड इंजिनीयरिंग विभागाचे प्रा. शुभांकर करमाकर, सिव्हिल इंजिनीयरिंग विभागाचे प्रा. सुबिमल घोष आणि प्रा. रघू मुर्तूगुड्डे यांनी हा अभ्यास अहवाल बनवला आहे. संभाव्य नैसर्गिक धोके टाळण्यासाठी सरकारने क्लायमेट ऍक्शन प्लॅनमध्ये केलेली गुंतवणूक वाखाणण्याजोगी असली तरी त्यात सातत्य राखणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे. कुटुंब नियोजन, शिक्षण आणि मुलींच्या सुरक्षेसाठी असलेल्या योजनांमध्ये झालेली गुंतवणूक प्रशंसनीय असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

सामाजिक सुरक्षा वाढली
नैसर्गिक आपत्तींचे धोके वाढत असतानाच देशात सामाजिक सुरक्षेबाबत समाधानकारक वातावरण असल्याचे या अहवालात म्हटले आहे. साक्षरतेचे प्रमाण आणि रोजगार करणाऱयांची संख्या वाढल्याचा हा परिणाम असल्याचे प्रा. विठ्ठल एच. यांनी म्हटले आहे. कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढल्याने लोकसंख्येवरही नियंत्रण येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.