भेंडी, गवारीने भाव खाल्ला… शंभरी गाठली! दहा दिवसांत मंडयांमध्ये महागाईची लाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोमॅटोने काही दिवसांपूर्वी सफरचंदालाही मागे टाकले होते. कांदाही कडाडला होता. आता भेंडी-गवारने भाव खाल्ला आहे. किलोभर भेंडी आणि गवार घ्यायची झाली तर शंभराची नोट पाहिजे. दोघांचे दर दुपटीने वाढले आहेत. अवकाळी पाऊस आणि इंधन दरवाढीने मंडयांमध्ये महागाईची लाट आली आहे. 30 रुपये किलोने मिळणारी वांगी दुपटीपेक्षा जास्त महागली आहेत. 20-30 रुपये किलोपुढे मजल नसलेल्या गाजरानेही साठी ओलांडली आहे. या महागाईने सामान्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतला आहे. त्यांच्या ताटातून भाजी वजा होऊ लागली आहे.

अवकाळी पावसाने भाजीपाल्याची नासधूस केली. शेतातील पिकांचे नुकसान झाले. नवा भाजीपाला पिकवण्यासाठी किमान महिना-दीड महिन्याचा कालावधी लागतो. दरम्यान आवक घटल्याने भाज्यांचे दर सतत वाढत आहेत. त्यातच इंधनाच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्या खर्चाशी हातमिळवणी करण्यासाठी व्यापाऱयांनी आवक कमी झाल्याचे कारण सांगत भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले आहेत.

मुंबईत पुणे, नाशिक, कल्याण येथून भाजीपाल्याची आवक होते. परंतु गेल्या दहा दिवसांमध्ये आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. बाजारात गेल्यानंतर किमान दोन-तीन दिवसांची भाजी तरी खरेदी केली जाते. पण आता केवळ एका वेळच्या किलोभर भाजीसाठी शंभराची नोट मोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. चांगल्या प्रतीचा टोमॅटो 50 रुपयांवरून 70 रुपयांवर पोहोचला आहे. मागणी असल्याने सध्या पूर्णपणे तयार न झालेले हिरवे टोमॅटो बाजारात येत असल्याचेही दिसून येत आहे.

10-15 दिवसांपासून नवीन हंगामातील भाज्या येत असून त्याची किंमत दुप्पट झाली आहे. हा वाढलेला भाव आणखी महिनाभर राहील. महिनाभरानंतर नव्या हंगामानुसार भाज्या येतील. त्यामुळे कोणता भाव असेल माहीत नाही. – सूर्यकांत पंदरपळे, किरकोळ भाजी विव्रेता, प्रभादेवी मार्पेट

वाशी मार्पेटमध्ये देशाच्या कानाकोपर्यातून भाजी येते. मात्र, यावेळी महाराष्ट्र, गुजरातसह देशातील अनेक भागांत अवेळी पाऊस पडल्यामुळे बाजारात मालच कमी येत आहे. घाऊक व्यापारी माल कमी घेत आहेत. त्यामुळे भाज्या दुपटीने महागल्या आहेत. – केशव चौहान, घाऊक भाजी विव्रेता, दादर भाजी मंडई

भाज्यांचे भाव वाढल्यामुळे आता जास्त भर कडधान्यांवर देत आहोत. मात्र, भाज्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे भाज्या घेणे भागच आहे. मात्र, आता भाज्या घेताना विचार करावा लागत आहे. – सुनीता उपासे, गृहिणी, प्रभादेवी

अवेळी पावसामुळे सर्वच भाज्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. भाज्या कमी येतात आणि त्यांचा भावही वाढलेला आहे. त्यामुळे दिवसाला विकला जाईल, इतकाच माल विव्रेते खरेदी करत आहेत. – दिलीप कुमार, घाऊक भाजी विक्रेता

जेवणात भाज्या काय करायच्या आणि कशा पुरवायच्या याचा प्रश्न पडला आहे. मात्र, काहीही झाले तरी नेहमीच्या भाज्या चढया दराने घ्याव्याच लागतात. – रेखा शेट्टी, गृहिणी, शीव

दादर मार्केटमधील 25 टक्के गाळे बंद

सध्या नाशिक, पंजाब, सुरत, मध्य प्रदेशमधून आवक खूप कमी होत आहे. घाऊक भाज्या दामदुपटीने घ्याव्या लागतात. त्यामुळे दादर भाजी मंडईतील काही घाऊक विव्रेते भाज्या कमीच खरेदी करत आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत भाज्या संपल्या की गाळे बंद करून घरी जातात. सध्या 25 टक्के गाळे हे दुपारीच बंद होतात.

सीझनल भाज्यांनी परिस्थिती सांभाळली

इतर भाज्या महाग झाल्या असल्या तरी सीझनल भाज्यांनी परिस्थिती थोडी सांभाळल्यासारखी दिसून येते. मटार, कोबी, घेवडा, दुधी यांची आवक वाढल्याने त्यांचे दर नियंत्रणात आहेत. आवक वाढली की भाज्यांचे भाव कमी होतात. इतर भाज्यांचे दरही महिनाभरानंतर कमी होतील, असा व्यापाऱयांचा अंदाज आहे.

दर घटले

  • टॉमेटो 70 वरून 50
  • दुधी 100 वरून 48

दर वाढले

  • भेंडी 48 वरून 100
  • गवार 60 वरून 100
  • फ्लॉव्हर 34 वरून 72
  • सिमला मिरची 48 वरून 72
  • गाजर 32 वरून 64
  • वांगी 30 वरून 70
  • बीट 40 वरून 80
  • कांदा 28 वरून 40