
विराट कोहलीच्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये घवघवीत यश संपादन केले. ट्वेण्टी-20 मध्ये 2-0, वन डेमध्ये 2-0 आणि कसोटीमध्ये 2-0 अशा फरकाने दणदणीत विजय संपादन करणाऱ्या टीम इंडियाने कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 120 गुणांची कमाई करीत अव्वल स्थानही पटकावले आहे. हिंदुस्थानने येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत यजमान वेस्ट इंडीजचा 257 धावांनी धुव्वा उडवला. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक साजरे करणाऱ्या हनुमा विहारीची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. या विजयासह कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. त्याने महेंद्रसिंह धोनीच्या 27 कसोटी विजयांना लीलया मागे टाकले. 28 कसोटी विजयासह विराट कोहली हिंदुस्थानचा सर्वोत्तम कर्णधार ठरलाय.
हिंदुस्थानने 416 धावसंख्या उभारल्यानंतर वेस्ट इंडीजला 117 धावांवर रोखून पहिल्या डावात 299 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर हिंदुस्थानने 54.4 षटकांत 4 बाद 168 धावसंख्येवर दुसरा डाव घोषित करून विंडीजला विजयासाठी 468 धावांचे कठीण आव्हान दिले. मयांक अग्रवाल (4), लोकेश राहुल (6), कर्णधार विराट कोहली (0) ही आघाडीची फळी झटपट बाद झाल्याने हिंदुस्थानची दुसऱ्या डावात एक वेळ 3 बाद 36 अशी अवस्था झाली होती, मात्र चेतेश्वर पुजारा (27) बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे (नाबाद 64) व हनुमा विहारी (नाबाद 53) यांनी 111 धावांची अभेद्य भागीदारी करून हिंदुस्थानला दीडशेचा टप्पा ओलांडून दिला. या दोघांची अर्धशतके पूर्ण झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने दुसरा डाव घोषित केला. विंडीजकडून केमार रोचने 3, तर जेसन होल्डरने 1 फलंदाज बाद केला.
चौथ्या डावात वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. हिंदुस्थानी गोलंदाजांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 201 धावांमध्येच गडगडला. शमारह ब्रुक्सने सर्वाधिक 50 धावा तडकावल्या. हिंदुस्थानकडून मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी 3 आणि इशांत शर्माने 2 व जसप्रीत बुमराहने 1 फलंदाज बाद केला.
बुमराह सर्वोत्तम गोलंदाज – कोहली
बुमराहच्या गोलंदाजीचा अँगल, स्विंग आणि वेग भल्याभल्याना चकवतो. तो सध्याचा सर्वात परिपूर्ण गोलंदाज आहे. टी-20 क्रिकेटमधला हुकमी गोलंदाज असा शिक्का बसलेला एखादा गोलंदाज एकदिवसीय व कसोटीमध्ये जबरदस्त कामगिरी करतो तेव्हा खूप समाधान वाटते. त्याच्याबद्दलचा लोकांचा समज त्याने खोडून काढला आहे, असे कौतुक विराट कोहलीने केले आहे. तसेच तो पुढे म्हणाला, बुमराहसारखा गोलंदाज संघात असणं हे कर्णधार म्हणून माझे भाग्य आहे. जगातला सर्वोत्तम गोलंदाज बनण्याची त्याची इच्छा आहे. त्या दिशेने तो ठरवून वाटचाल करतोय. डाएट व शिस्तीला तो खूप महत्त्व देतो. बुमराहचा वेग आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा सामना करावा लागणाऱ्या फलंदाजांबद्दल मला सहानुभूती आहे.
कोहलीची घसरण, बुमराहची झेप
कसोटी मालिकेत जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (गोलंदाजी) तिसऱ्या स्थानावर झेप घेतली असून कर्णधार विराट कोहलीची मात्र दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीवन स्मिथ फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाचाच पॅट कमिन्स गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. जेसन होल्डर अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. हिंदुस्थानने 113 रेटिंगसह पहिले स्थान कायम राखले आहे.
सलग आठवा मालिका विजय
हिंदुस्थानने वेस्ट इंडीजला सलग आठव्यांदा कसोटी मालिकेत पराभूत केले हे विशेष. 2002-03 सालापासून हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडीजविरुद्ध एकाही मालिकेत हरलेला नाही. यादरम्यान आठ मालिका दोन्ही संघांमध्ये पार पडल्या आहेत.

























































