हा संघर्ष अण्वस्त्र युद्धापर्यंत पोहचणार नाही,अशी अपेक्षा करूया; अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी व्यक्त केली चिंता

हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणाव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकड्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच पाकड्यांनी हिंदुस्थानवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला. तो सुरक्षा दलाने हाणून पाडला. हिंदुस्थान पाकड्यांच्या प्रत्येक कारवाईला जबरदस्त प्रत्युत्तर देत आहे. जागतिक नेते दोन्ही बाजूंना शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संघर्षावर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी चिंता व्यक्त करत हा संघर्ष अण्वस्त्र युद्धापर्यंत जाणार नाही, अशी अपेक्षा करूया, असे म्हटले आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. हिंदुस्थानी हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने हे हल्ले रोखले आणि पाकिस्तानचा डाव हाणून पाडला. प्रत्युत्तरादाखल हिंदुस्थानी सैन्याने कराची बंदराला लक्ष्य केले आणि तेथील रडार आणि संरक्षण प्रणाली नष्ट केल्या. त्यात एक अमेरिकन एफ-16 आणि दोन चिनी जेएफ-17 लढाऊ विमानांचा समावेश होता.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी या वाढत्या तणावावर म्हटले आहे की, अमेरिकेची इच्छा असली तरी या संघर्षात आम्ही थेट हस्तक्षेप करणार नाही. दोन्ही देशांना शस्त्रे टाकण्यास सांगणे सोपे नाही आणि अमेरिका राजनैतिक मार्गाचा अवलंब करून परिस्थिती बिघडू नये म्हणून प्रयत्न करत आहे. हा संघर्ष मोठ्या प्रादेशिक युद्धात किंवा अण्वस्त्र युद्धापर्यंत पोहचणार नाही, अशी अपेक्षा करूया, असेही ते म्हणाले.