
सध्याच्या घडीला हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या युद्धाच्या परिस्थितीचे पडसाद आता देशभरात उमटू लागले आहेत. त्यामुळेच आता सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील महत्त्वाच्या पदांवरील विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या राज्य सरकारकडून रद्द करण्यात आल्या आहेत. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणावाला सामोरे ठेवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणाच्या माध्यमातून एकूणच सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत प्रामुख्याने, मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी बाबतीत आढावा घेण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावेळी विविध दिशानिर्देशही दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करण्याचे तसेच जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. याचबरोबर ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करावी. तसेच हल्ला झाल्यास, टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात. अशावेळी पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.