इंडिया पोस्ट बँकेची सेवा सिंधुदुर्गात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मालवण प्रधान कार्यालयात शुभारंभ

सामना प्रतिनिधी । मालवण

पोस्टाच्या विश्वासाहार्यतेमुळे पोस्ट बँकेची प्रगती अल्पावधीतच होऊन सर्वसामान्य ग्राहकांना घरबसल्या किफायतशीर सेवा मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ देशभरात झाला आहे. सिंधुदुर्गातील या सेवेचा शुभारंभ मालवण प्रधान डाक कार्यालयात पोस्ट बँकेची जिल्हा शाखा सुरू करून करण्यात आला.

मालवण येथील पोस्ट कार्यालयाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ सोहळा मामा वरेरकर नाट्यगृह येथे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्गचे डाक अधीक्षक संजय देसाई, सहाय्यक डाकघर अधीक्षक जी. एस. राणे, मालवण डाकघरचे प्रधान डाकपाल रमाकांत गोसावी, आय. पी. पी. बी. मालवण शाखा मॅनेजर रंजिथ राजेंद्र, एरिया सेल्स मॅनेजर अमित तिवारी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, गटनेते गणेश कुशे, दिपक पाटकर, ममता वराडकर, लिलाधर पराडकर, बबलू राऊत, पंकज सादये आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची समोयचित भाषणे झाली.

जिल्ह्यात कट्टा (जामसंडे), इळये, कुणकेश्वर येथील उपसेवा केंद्राचेही एकाचवेळी स्थानिक पातळीवर सरपंच व इतर मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तर जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये येत्या ३१ डिसेंबरपर्यंत पेमेंट बँकेचे सेवाकेंद्र कार्यान्वित करण्याचा डाक विभागाचा मानस आहे, असे व्यवस्थापक रंजिथ राजेंद्र यांनी स्पष्ट केले.

वैभव नाईक म्हणाले, जिल्ह्यात ग्रामीण व दुर्गम भागातील जनता आजही बँकिंग सेवेपासून वंचित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून घरबसल्या बँकेची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे. त्यामुळे पेमेंट बँकेच्या माध्यमातून अनेक चांगल्या व दर्जेदार बँकिंग सेवाही पोस्ट खात्यामार्फत ग्रामीण जनतेला घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. असा विश्वास व्यक्त केला.