महिला फुटबॉल संघाला फिफा वर्ल्ड कपची संधी

हिंदुस्थानच्या महिला फुटबॉल संघाने तब्बल 22 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एएफसी महिला आशिया चषक स्पर्धेची पात्रता मिळवून इतिहास घडविला. हिंदुस्थानच्या याच महिला संघाला आता फिफा वर्ल्ड कपचे तिकीट खुणावू लागले आहे. जबरदस्त फॉर्मात असलेल्या या संघाला 2027 मध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपचे तिकीट बुक करण्याची यावेळी नामी संधी असेल.

2026 मध्ये होणाऱया महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत 12 देशांचा समावेश आहे. या स्पर्धेत हे 12 संघ तीन गटांत विभागले जातील. ही स्पर्धा राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये होईल. गटातील विजेता, उपविजेता व तिसऱया स्थानावरील दोन सर्वोत्तम संघ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल होतील. उपांत्यपूर्व फेरीतील विजेते संघ 2027च्या महिला फुटबॉल वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार आहेत. या फेरीतील पराभूत संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. यातील विजेता संघ आधीच पात्र ठरलेल्या चार संघांत सहभागी होईल. यातील पराभूत संघांनाही पात्रता मिळविण्याची आणखी एक संधी असेल. या फॉरमॅटमुळे हिंदुस्थानच्या महिला संघाला फिफा वर्ल्डसाठी पात्र ठरण्याची यंदा संधी असेल.