
फॉर्ममध्ये नसल्यामुळे खुद्द रोहित शर्माने स्वताला विश्रांती दिली… फलंदाजी मजबूत व्हावी म्हणून आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाज ठेवले… तरीही हिंदुस्थानी फलंदाजांनी बॉर्डर-गावसकर करंडकातील आपले रडगाणं सिडनीतही कायम ठेवले. वेगवान गोलंदाजीला अंगावर झेलत झुंजार खेळ करणाऱया ऋषभ पंतच्या 40 आणि जसप्रीत बुमराच्या फटकेबाज 22 धावांच्या जोरावर हिंदुस्थानने कशीबशी 185 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी मालिकेतील आपला भन्नाट मारा सिडनीतही टाकण्याची करामत करत पहिल्या दिवसावर आपली मोहोर उमटवली. मात्र दिवसअखेर जसप्रीत बुमराने उस्मान ख्वाजाला टिपत हिंदुस्थानला दिवसअखेर दणदणीत उस्मान ख्वाजारूपी यश मिळवून दिले.
टॉस जिंकलो, पण फलंदाजीत ढासळलो…
हिंदुस्थानने पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल जिंकला. पर्थ कसोटीतही जसप्रीत बुमराने टॉस जिंकून फलंदाजी घेतली होती. आजही त्याने त्याचीच पुनरावृत्ती केली आणि हिंदुस्थानी फलंदाजांना मैदानात उतरवले. या मालिकेत पाचपैकी मेलबर्न कसोटीवगळता अन्य चारही कसोटी सामन्यांत हिंदुस्थाननेच नाणेफेकीचा कौल जिंकला होता, मात्र तो कौल आजही हिंदुस्थानसाठी लाभदायक ठरला नाही. पर्थ कसोटीत हिंदुस्थान प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 150 धावांत आटोपला होता. या कसोटीतही हिंदुस्थानवर तीच नामुष्की आली होती. मात्र आज बुमराच्या तडाखेबंद 22 धावांमुळे हिंदुस्थानी संघ दीडशेचा टप्पा गाठून 185 पर्यंत पोहोचला.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची दहशत
सिडनीची खेळपट्टी फलंदाजीला पोषक असली तरी हिंदुस्थानच्या सर्वच फलंदाजांना एकेका धावेसाठी संघर्ष करावे लागले. ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडूंचा हिंदुस्थानी फलंदाजांनी इतका जबर धसका घेतला होता की, चेंडू ऑफ स्टम्पवर पडताच त्याला सोडून देण्याचे काम राहुलपासून नितीशपर्यंत सर्वांनी केले आणि त्याच चेंडूंवर आपली विकेटही गमावली. या धसक्यामुळे हिंदुस्थानची धावगती इतकी मंदावली होती की, पहिल्या सत्रात 57, दुसऱया सत्रात 50 धावाच हिंदुस्थानी फलंदाजांना फलकावर लावता आल्या होत्या. बचावात्मक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात हिंदुस्थानी फलंदाज आपला मूळ खेळच विसरले. पूर्ण डावात हिंदुस्थानने 15 चौकार आणि 2 षटकार लगावले.
यशस्वी-राहुल अपयशी
गेल्या कसोटीत राहुलला सलामीला खेळता आले नव्हते. मात्र आज रोहित शर्माच्या विश्रांतीमुळे राहुलला (4) पुन्हा सलामीला उतरण्याची संधी मिळाली. पण मिचेल स्टार्कने त्याला टिकूच दिले नाही. मग यशस्वी जैसवालचा (10) झंझावात सुरू होण्याआधीच त्याची वात विझवण्याची किमया बोलॅण्डने केली. 17 धावांतच सलामीची जोडी बाद झाल्यामुळे हिंदुस्थानी संघ दडपणाखाली आली आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपली दहशत माजवत पहिल्या दिवसावर आपले राज्य गाजवले.
खूब लढा पंत…
आघाडीचे तिन्ही फलंदाज लवकर बाद झाल्यावर संकटमोचक ऋषभ पंत मैदानात आला. नेहमीच आक्रामक शैलीत खेळणाऱया पंतला सावधपणे खेळण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे आज तो अक्षरशः डोक्यावर बर्फ ठेवून खेळत होता. त्याने आपले आक्रामक फटके म्यान करून ठेवले होते. ना तो ऑफ स्टम्पवर तुटून पडत होता ना आखूड टप्प्याच्या चेंडूला हुक मारण्याचे धाडस दाखवत होता. बचावात्मक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात स्टार्कचा उसळता चेंडू पंतच्या दंडावर बसला. स्टार्कच्या चेंडूचा वेग इतका होता की, पंतचा दंड काही सेकंदातच काळा निळा पडला. फिजिओने बर्फाने शेकल्यानंतर पंत पुन्हा फलंदाजीला तयार झाला. मग पुढच्याच षटकांत स्टार्कच्या उसळत्या चेंडूने पंतच्या हेल्मेटचा वेध घेतला. तेव्हा खिलाडूवृत्ती दाखवत स्टार्क पंतला मदत करण्यासाठी पुढे सरसावला. इतके हल्ले झेलल्यानंतर पंतने खुलून खेळण्याचा प्रयत्न केला, त्यात त्याची विकेट घेण्यात बोलॅण्डने टिपली. पंतने अडीच तासांच्या संघर्षपूर्ण खेळीत 98 चेंडूंत 40 धावांची डावातील सर्वोच्च खेळी केली. त्याने रवींद्र जाडेजासह पाचव्या विकेटसाठी 48 धावांची भर घातली. पण ही जोडी फुटल्यानंतर पुढच्याच चेंडूवर नितीशकुमार रेड्डीचीही विकेट बोलॅण्डने काढली. त्याला हॅटट्रिकची संधी होती, पण वॉशिंग्टन सुंदरने ती टाळली. गेल्या डावात एका धावेवर बाद झालेला नितीश आज भोपळासुद्धा फोडू शकला नाही. त्यानंतर बुमराच्या फटकेबाजीमुळे हिंदुस्थानी संघ 185 धावांपर्यंत मजल मारू शकला. स्कॉट बोलॅण्डने अत्यंत किफायतीशीर गोलंदाजी करताना 20 षटकांत 31 धावांत 4 विकेट टिपल्या. स्टार्कनेही 3 विकेट टिपल्या तर कमिन्सने 2 विकेट घेत आपली कामगिरी चोख बजावली.
विराटचा धसका कायम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच धावांचा पाऊस पाडणाऱ्या विराट कोहलीने ऑफ स्टम्पबाहेरच्या चेंडूंचा इतका जबरदस्त धसका घेतला होता की, आजही तो दहशतीखालीच वावरताना दिसला. त्याने ऑफ स्टम्पबाहेरचा प्रत्येक चेंडू सोडत धीराने फलंदाजी केली, पण त्याचा हा संयम फार काळ टिकला नाही. खेर बोलॅण्डच्या तशाच चेंडूवर त्याची 69 चेंडूंची खेळी 17 धावा करून संपली. पर्थवर कसोटी शतक झळकावणाऱ्या विराटने या मालिकेतील आठ डावांत 17, 5, 36, 3, 11, 7, 100, 5 अशा निराशाजनक खेळय़ा (100 धावा वगळता) केल्या आहेत.
बुमरा आणि कॉन्सटसची ठस्सन
आज मैदानावर अनेक नाटय़मय घटना घडल्या. विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद होता, पण तिसऱया पंचांनी त्याला नाबाद ठरवले. पुढे पंतला दोन अंगावर चेंडू झेलावे लागले. त्यामुळे वातावरण काहीसे तापलेच होते. हिंदुस्थानचा डाव आटोपल्यावर शेवटच्या तीन षटकांसाठी ऑस्ट्रेलिया मैदानात उतरली. तेव्हा हिंदुस्थानी गोलंदाजही आक्रमक शैलीतच मैदानात उतरले होते. सलामीवीर उस्मान ख्वाजाला स्ट्राइक घेण्यासाठी वेळ लागत होता. त्यातच तो आणखी उशीर लावत होता. तेव्हा नॉनस्ट्राइक एण्डला उभ्या असलेल्या सॅम कॉन्सटसने मागे वळून बुमराला थांबण्याचा इशारा दिला. बुमराने रनअप घेतला होता आणि त्याला कॉन्सटसने रोखल्यामुळे बुमराला राग आला. तेव्हा दोघांमध्ये ठस्सन पाहायला मिळाली. बुमरा मागे गेल्यावरही कॉन्सटस बडबडत होता आणि त्याच्या या वागण्यामुळे संतप्त झालेल्या बुमराने पुढच्याच चेंडूवर ख्वाजाची विकेट काढून हिंदुस्थानला दिवसाच्या शेवटी सनसनाटी निर्माण करणारे यश मिळवून दिले. बुमराच्या फुल लेंग्थ चेंडूने ख्वाजाच्या बॅटची अलगद कड घेतली आणि तो चेंडू राहुलच्या हातात विसावला.