देशात सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 815 वर; 24 तासांत 4 मृत्यू; केरळ, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्रातील प्रत्येकी एकाचा मृत्यू

covid-19-jn1-variant-raises-concerns-in-asia

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यात आज 324 रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 815 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिल्लीसह अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सोमवारीच्या तुलनेत कमी झाली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात केरळ, दिल्ली, झारखंड आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

देशात जानेवारीपासून कोरोना रुग्ण पुन्हा सापडू लागले असून आतापर्यंत ही संख्या 6 हजार 815 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 2 हजार 23 रुग्ण सापडले आहेत. केरळपाठोपाठ गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि महाराष्ट्रातही मोठया प्रमाणात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर तर मृत्यूच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.

पनवेलमध्ये 45 वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू

राज्यात दिवसभरात 89 कोरोना रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत 18 हजार 103 कोरोना चाचणी करण्यात आल्या असून 1 हजार 593 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 959 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 615 जण सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून बरे होण्याचे प्रमाण 56 वरून 60 टक्क्यांवर पोहोचले आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये मुंबईत सर्वाधिक रुग्ण 32 तर पुण्यात 24 रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, पनवेलमध्ये 45 वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला. या व्यक्तीला कोरोनासह हृदयविकार आणि इतर सहव्याधी होत्या, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. कोरोनामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.