हिंदुस्थानात कोरोनाचा दुसरा रुग्ण, केरळात स्वतंत्र वॉर्डमध्ये उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमध्ये कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण सापडल्यामुळे या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दोन झाली आहे. हे दोन्ही रुग्ण केरळमधील असून त्यांच्यावर त्रिचूर मेडिकल कॉलेजमधील वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेली कोणतीही आणीबाणीची परिस्थितीशी सामना करण्यास राज्य सरकार सक्षम आहे, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे.

चीनमध्ये शिकायला गेलेल्या केरळमधील मुलीला कोरोनाची लागण झाली. तिच्यावर त्रिचूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. चीनमध्ये पर्यटनासाठी केलेल्या एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यामुळे तिच्यावर अलप्पुझा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. रुग्णाला वेगळय़ा वॉर्डमध्ये ठेवण्यात आले असून त्याच्यावर उपचार आणि देखरेख करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम नेमण्यात आली आहे. चीनमध्ये अडकून पडलेल्या 324 हिंदुस्थानींना आतापर्यंत मायदेशी आणण्यात आले आहे. चीनमध्ये या व्हायरसने धुमाकुळ घातला असून आतापर्यंत 304 लोकांचा बळी गेला आहे तर 4 हजार लोकांना त्याची लागण झाली आहे. चीनमधून 18 देशांमध्ये हा व्हायरस पसरला आहे.

रविवारी 323 हिंदुस्थानी परतले
चीनमध्ये कोरोनो व्हायरसमुळे वुहान प्रांतात अडकून पडलेल्या 323 जणांना रविवारी एअर इंडियाच्या सुखरूप परत आणण्यात आले. याशिवाय मालदिवच्या 7 नागरिकांनाही परत आणण्यात आले. या आधी शनिवारी एअर इंडियाच्या विमानाते 324 हिंदुस्थानी मायदेशी परतले आहेत. हिंदुस्थानने 18 जानेवारीपासून आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. चीनमधून परतणाऱया हिंदुस्थानी नागरिकांची विमानतळांवर कोरोनाविरोधातील वैद्यकीय चाचणी केली जात आहे. चीनबरोबर सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंडमधून नेणाऱया पर्यटकांचीही कोरोनाविरोधातील चाचणी केली जात आहे. आतापर्यंत देशभरातील 21 विमानतळांवरील 326 विमानातून आलेल्या 52 हजार 332 प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे.

चीनमध्ये पर्यटनासाठी केलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर अलप्पुझा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ वायरॉलॉजीकडून या रुग्णाबाबतचा अहवाल मिळालेला नाही. हा अहवाल मिळाल्यानंतर त्याला लागण झाली असल्याचे आम्ही अधिकृतपणे जाहीर करू.
– के. के. शैलजा, आरोग्यमंत्री, केरळ

कोरोनाचे 12 संशयित रुग्णालयातून घरी

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून राज्यातील चार वेगवेगळ्या रुग्णालयांतील विलगीकरण कक्षात उपचारांसाठी 17 प्रवाशांना दाखल केले होते. त्यापैकी 12 जणांना घरी पाठवण्यात आले आहे. उर्वरित पाच जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांनाही घरी पाठवण्यात येईल असे राज्याच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या मुंबईतील रुग्णालयात दोन तर पुण्यातील रुग्णालयात तीन जणांना संशयावरून दाखल केले आहे.

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत आठ जण दाखल होते त्यापैकी सहा जणांना घरी सोडले आहे. पुणे येथील नायडू रुग्णालयात शनिवारी दोघांना भरती केले त्यापूर्वी दाखल असलेल्या पाच जणांपैकी चौघांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या तिघे दाखल आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि नांदेड येथील भरती केलेल्यांनाही घरी पाठवले आहे.