
हिंदुस्थानी खेळाडूंनी पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरीची मोहोर आशियाई क्रीडा विश्वावर उमटवली आहे. व्हिएतनाममधील हाय फोंग येथे 16 ते 19 ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या आशियाई रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानच्या रोइंग पथकाने 10 पदकांची (3 सुवर्ण, 5 रौप्य, 2 कांस्य) दणदणीत कमाई करत पाण्यावर हिंदुस्थानचा तिरंगा फडकवला. एकूण 15 स्पर्धांमध्ये 37 रोव्हर्स (25 पुरुष आणि 12 महिला) उतरले होते. त्यापैकी 10 स्पर्धांमध्ये हिंदुस्थानने विजेतेपद पटकावून इतिहास रचला.
पुरुषांच्या क्वाड्रपल स्कल स्पर्धेत कुलविंदर सिंह, नवदीप सिंह, सतनाम सिंह आणि जाकर खान यांच्या चौकडीने सुवर्णपदक पटकावत हिंदुस्थानसाठी विजयी सुरुवात केली. त्याचबरोबर लाइटवेट पुरुष डबल स्कल स्पर्धेत लक्ष्य आणि अजय त्यागी या जोडीनेही सुवर्ण पटकावले. हिंदुस्थानचा तिसरा सुवर्ण बलराज पवारने पुरुषांच्या सिंगल स्कलमध्ये दमदार कामगिरी करून मिळवला. पुरुषांच्या एट्स स्पर्धेत नितीन देओल, परविंदर सिंह, लखवीर सिंह, रवी, गुरप्रताप सिंह, भीम सिंह, जसविंदर सिंह, कुलबीर आणि किरण सिंह मायोम यांच्या संघाने रौप्य पदक मिळवले.
महिलांच्या लाइटवेट जोडी स्पर्धेत गुरबानी काwर आणि दिलजोत काwर यांनी ऐतिहासिक झेप घेत रौप्य पदक पटकावले. हे महिलांच्या आशियाई रोइंग चॅम्पियनशिपमधील 15 वर्षांनंतरचे पहिले पदक ठरले. या मोहिमेचे यश हिंदुस्थानच्या रोइंग इतिहासातील सर्वात उज्ज्वल अध्यायांपैकी एक मानले जात आहे. आशियाई पातळीवर हिंदुस्थान आता एक उदयोन्मुख शक्ती म्हणून उभी राहिली आहे. हिंदुस्थान रोइंग महासंघाचे अध्यक्ष बालाजी मरदप्पा यांनी अभिमान व्यक्त करत म्हटले की, ही केवळ पदकांची नोंद नाही. हे आपल्या खेळाडूंच्या अथक परिश्रम, शिस्त आणि जिद्दीचे प्रतीक आहे.