
गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानने हिंदुस्थानातील अनेक ठिकाणी मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु हिंदुस्थानी सैन्याने हा हल्ला हाणून पाडला. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमधील विमानतळ आणि रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त, पाकिस्तानने राजस्थानमधील पठाणकोट आणि जैसलमेरमध्येही आपल्या नापाक कारवाया करण्याचा प्रयत्न केला आहे.
यापूर्वी पाकिस्तानने हिंदुस्थानातील अनेक ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु S-400 क्षेपणास्त्राने ने त्यांचे नापाक हेतू हाणून पाडले. हिंदुस्थानने पाकिस्तानचे 1 एफ-16 आणि 2 जेएफ-17 लढाऊ विमाने तसेच 8 क्षेपणास्त्रे आणि 16 ड्रोन नष्ट केल्याचे वृत्त आहे.
याआधी 15 हिंदुस्थानी शहरांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात हल्ला केला. रात्री 9 वाजण्याच्या काही काळापूर्वी, जम्मूमध्ये मोठे स्फोट ऐकू आले. मग, सायरन वाजू लागले आणि वीज गेली. या काळातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
परिस्थिती बिकट होत असताना, शहराच्या अनेक भागात मोबाईल फोन सेवा विस्कळीत झाल्या, ज्यामुळे त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिकांमध्ये तणाव निर्माण झाला. जम्मू आणि काश्मीरच्या बहुतेक सीमावर्ती भागात आता वीजपुरवठा खंडित झाला आहे. पंजाबमधील फिरोजपूर आणि गुरुदासपूर आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानच्या काही भागातही ब्लॅकआउट घोषित करण्यात आले आहे.