गुरुग्रंथ साहिबच्या प्रती काबूलमधून हिंदुस्थानात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालिबान्यांनी कब्जा मिळवलेल्या अफगाणिस्तानातील हिंदुस्थानी नागरिकांना मायदेशी आणण्याची मोहीम सुरूच आहे. या मोहिमेंतर्गत मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून 46 अफगाणी शीख धर्मियांसह एकूण 78 नागरिकांना काबूलमधून हिंदुस्थानात आणण्यात आले. विशेष म्हणजे या विमानातून काबूलच्या गुरुद्वारांमधील पवित्र गुरुग्रंथ साहिबच्या तीन प्रतीसुद्धा सुरक्षितपणे हिंदुस्थानात आणण्यात आल्या.

तालिबान्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या 78 नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे एआय-1956 हे विमान तजाकिस्तानची राजधानी दुशांबेहून दिल्लीला पोहोचले. यादरम्यान केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, व्ही. मुरलीधरन आणि भाजप नेते आर.पी. सिंग आदी नेते दिल्लीच्या विमानतळावर पोहोचले होते. या नेत्यांनी विमानातील पवित्र गुरुग्रंथ साहिबच्या प्रती आपल्या डोक्यावर ठेवून अनवाणी चालत विमानतळाबाहेर आणल्या. नंतर या प्रती विधिवत पूजा करीत दिल्लीच्या एका गुरुद्वारामध्ये नेण्यात आल्या. गुरुग्रंथ साहिबसाठी खास पालखीही तयार करण्यात आली होती. सोमवारी काबूल विमानतळावर अफगाणी शीख हिंदुस्थानला जाणाऱया विमानाची वाट पाहत होते. त्यांनी आपल्या डोक्यावर गुरुग्रंथ साहिबच्या प्रती घेतल्या होत्या. त्यांचा फोटो सोमवारी समोर आला होता. गुरुग्रंथ साहिब हा पवित्र ग्रंथ जमिनीवर ठेवला जाऊ शकत नाही. त्यामुळे काबूल ते दिल्ली या संपूर्ण प्रवासात हा ग्रंथ शीख बांधवांनी आपल्या डोक्यावर ठेवत पावित्र्य जपले.