
अरुणाचल प्रदेशात जन्मलेल्या महिलेचा 18 तासांपेक्षा जास्त वेळ शांघाय विमानतळावर अडवून छळ केल्याच्या प्रकरणानंतर चीनने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. या महिलेचा कोणत्याही प्रकारे छळ झाला नसून जांगनान अर्थात अरुणाचल प्रदेश हा आमचाच भूभाग असल्याचे चीनने म्हटले. त्यानंतर, अरुणाचल प्रदेश हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत चीनला हिंदुस्थानने ठणकावले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी म्हटले की, महिलेसोबत कोणतीही बळजबरी, अटक किंवा त्रास देण्याचा कोणताही प्रकार घडला नाही. विमान कंपनीने महिलेला खाणे, पिणे आणि आराम करण्याची सुविधा दिली होती. जांगनान हा आमचाच भूभाग आहे. हिंदुस्थानने अवैधरित्या वसविलेल्या अरुणाचल प्रदेशला चीनने कधीच मान्यता दिलेली नाही.
मूळच्या हिंदुस्थानच्या असलेल्या पेमा वांग थांगडोक यांना जपानमधून ब्रिटनला परतताना शांघाय येथे ब्रेक घेतला होता. त्यावेळी ट्रान्झिटदरम्यान त्यांना इमिग्रेशन अधिकाऱयांनी 18 तासांपेक्षा जास्त काळ अडवून ठेवले होते. त्यांच्या पासपोर्टवर जन्मस्थान हे अरुणाचल प्रदेश लिहिलेले आहे. त्यामुळे त्यांचा पासपोर्ट अवैध ठरविला होता.
अरुणाचल प्रदेश हिंदुस्थानचा अभिन्न, अविभाज्य भाग; हिंदुस्थानने ठणकावले
हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जयस्वाल यांनी चीनच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अरुणाचल प्रदेश हिंदुस्थानचा अभिन्न आणि अविभाज्य हिस्सा आहे. चीनने कितीही नाकारले तरी सत्य बदलणार नाही, असे जयस्वाल यांनी चीनला ठणकावून सांगितले.
ते म्हणाले की, आम्ही पेम यांचा मुद्दा चीनकडे कठोर शब्दांमध्ये मांडला आहे. पेम यांना का रोखले, हे चीनी अधिकारी अजुनपर्यंत सांगू शकलेले नाहीत. चीनमध्ये 24 तासांपर्यंत विना व्हिसा ट्रांझिटची परवानगी आहे. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाबाबतच्या अनेक करारांचे त्यांच्याकडून उल्लंघन झालेले आहे.

























































