26 नोव्हेंबरला ‘भारत बंद’;शिवसेनेच्या कामगार संघटना सहभागी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने कामगार कायद्यात सुधारणेच्या नावाखाली तो मालक धार्जिणा आणि कामगारविरोधी बनवण्याचे कारस्थान केले. त्याविरोधात देशपातळीवरील सर्वपक्षीय कामगार संघटनांच्या कृती समितीने येत्या 26 नोव्हेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्या बंदमध्ये शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेशी संलग्न तसेच शिवसेना पुरस्कृत सर्व कामगार संघटनाही सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली.

केंद्र सरकारने कामगार कायद्यामध्ये सुधारणा सुचवणाऱया सामाजिक सुरक्षा कायदा, औद्योगिक संबंध कायदा आणि कामाची ठिकाणी कागारांची सुरक्षितता व आरोग्य या तीन विधेयकांमध्ये 29 नव्या तरतूदी केल्या आहेत. त्याला सर्व कामगार संघटनांचा विरोध आहे. ‘भारत बंद’च्या पूर्वतयारीची महत्वाची बैठक शिवसेना भवन येथे झाली. त्यात शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांनी मार्गदर्शन केले. कामगार कायदा सुधारणेच्या नावाखाली केंद्र सरकारने केलेले बदल हे मालक धार्जिणे असून गेल्या कित्येक वर्षात वेगवेगळ्या कामगार कायद्यांद्वारे कामगारांना मिळालेली सुरक्षितता त्यामुळे धोक्यात आली आहे. म्हणूनच या कायद्याला सर्व कामगार संघटनांनी विरोध करणे गरजेचे असल्याचे अडसुळ यावेळी म्हणाले.

शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी कामगार कायद्यातील बदलांसंदर्भात यावेळी मार्गदर्शन केले. या बदलांमुळे 300 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपन्यांसाठी नोकरभरतीची प्रक्रिया नवीन धोरणाने होईल जी मालकांना फायदेशीर असेल, कर्मचाऱयांना ठराविक मुदतीसाठी कामावर ठेवणे कायदेशीर होईल, पुणीही कामगार कायमस्वरुपी असणार नाही, 300 पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्यांतील विभाग बंद करण्यास किंवा नोकर कपातीसाठी सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही असे धोके असल्याचे खासदार देसाई यांनी सांगितले.

सदर विधेयके ही कॉर्पेरेट धार्जिणी असल्याचे शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी सांगितले तर सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांनी कामगार कायद्यातील बदलांमुळे कामगारवर्ग पुन्हा एकदा शंभर वर्षांपूर्वीसारखा अनिश्चिततेच्या गर्तेत जाईल असे सांगितले. शिवसेनेच्या सर्व कामगार संघटनांनी या बंदमध्ये संपूर्ण शक्तीनिशी सहभागी व्हावे असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.  या बैठकीला भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष अजित साळवी, सरचिटणीस संतोष चाळके, चिटणीस वामन भोसले यांच्यासह भारतीय कामगार सेनेच्या संलग्न व शिवसेना पुरस्कृत सर्व कामगार संघटनांचे प्रमुख पदाधिकारी तसेच स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिपत्याखालील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.