
कोरोना काळ, नैसर्गिक संकटे, राजकीय डावपेच अशा प्रत्येक संकटातून मार्ग काढत राज्यातील जनतेच्या पाठीशी राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा देशात सर्वोत्तम मुख्यमंत्री ठरले आहेत. इंडिया टुडे माध्यम समूहाने देशभरात केलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान पटकावले आहे. या यादीत भाजपचे केवळ एक मुख्यमंत्री आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विस्व शर्मा सातव्या क्रमांकावर आहेत.
इंडिया टुडे माध्यम समुहातर्फे प्रत्येक राज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत विचारण्यात आले. या सर्वेक्षणानंतर 43 टक्क्यांहून अधिक मतं मिळालेल्या 9 मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. उद्धव ठाकरे यांनी संकटकाळातही सक्षमपणे हाताळलेल्या परिस्थितीवर 61.8 टक्के जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
यादीत भाजपचा केवळ एक मुख्यमंत्री
पहिल्या क्रमांकावर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्थान मिळवलं आहे. पटनायक यांनी केलेली कामगिरी 71.1 टक्के नागरिकांना समाधानकारक वाटली. दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा क्रमांक आहे. ममता यांच्या कामगिरीला 69.9 टक्के लोकांनी पसंती दिली. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. त्यांच्या कामावर 61.6 टक्के जनतेनं समाधान व्यक्त केलं आहे. सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. 57.9 टक्के जनता त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नऊ मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचे केवळ एक मुख्यमंत्री आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विस्व शर्मा सातव्या क्रमांकावर आहेत. आसाममधील 56.6 टक्के जनतेनं त्यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं. यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (51.4 टक्के), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (44.9 टक्के) यांचा क्रमांक आहे.































































