
सर्वाधिक पाच वेळा युवा जगज्जेते ठरलेल्या हिंदुस्थानने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानकडून मिळालेले विक्रमी लक्ष्य सहज पार करीत हरारेत ऐतिहासिक विजय साकारला. तब्बल 621 धावांची लयलूट झालेल्या 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ही लढत 7 फलंदाज अन् 53 चेंडू राखून जिंकत हिदुस्थानने दहाव्यांदा अंतिम फेरी गाठण्याचा भीमपराक्रम केला. सलामीवीर अॅरोन जॉर्जचा शतकी धमाका, वैभव सूर्यवंशीचे वादळी अर्धशतक अन् कर्णधार आयूष म्हात्रेचे दमदार अर्धशतक ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. शतकवीर अॅरोन जॉर्ज या सामन्याचा मानकरी ठरला. आता शुक्रवारी जेतेपदाच्या लढतीत युवा हिंदुस्थानी संघापुढे तुल्यबळ इंग्लंडचे आव्हान असेल. इंग्लडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.
वैभव सूर्यवंशीचे वादळ
अफगाणिस्तानकडून मिळालेले 311 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 41.1 षटकांत केवळ 3 फलंदाजांच्या मोबदल्यात सहज गाठत विजयावर शिक्कामोर्तब केले. वैभव सूर्यवंशीने स्पह्टक फलंदाजी करताना 33 चेंडूंत 9 सणसणीत चौकारांसह 4 टोलेजंग षटकार ठोपून 68 धावांची वादळी खेळी करीत हिंदुस्थानच्या विजयाची पायाभरणी केली. त्याने अॅरोन जॉर्जच्या साथीत 57 चेंडूंत 90 धावांची खणखणीत सलामी दिली. नुरिस्तानी ओमरजाईने सूर्यवंशीला ओसमान सादतकरवी झेलबाद करून अफगाणिस्तानला मोठे यश मिळवून दिले. मात्र त्यानंतर अॅरोनने आलेल्या आयुष म्हात्रेच्या साथीत दुसऱया विकेटसाठी शतकी भागीदारी करीत अफगाणिस्तानची गोलंदाजी निष्प्रभ ठरविली. या दोघांनी 102 चेंडूंत 114 धावांची भागीदारी केली. ओमरझाईनेच आयूषला ओसमान सादतकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. मात्र तोपर्यंत हिंदुस्थानने 26.2 षटकांतच दोनशे धावांचा टप्पा ओलांडला होता.
सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग
हिंदुस्थानच्या युवा संघाने या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. इतकेच नव्हे तर युवा वन डे क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा टार्गेट चेस करण्याचा विक्रमही हिंदुस्थानी संघाने आपल्या नावावर केला. या सामन्यात एकूण 621 धावा झाल्या, जो हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यातील युवा एकदिवसीय सामन्यांतील सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. याआधीचा विक्रम 521 धावांचा होता,
फैझल-उझैरच्या शतकांनी आणली जान
अफगाणिस्तानला सुपरसिक्समध्ये श्रीलंकेकडून हार सहन करावी लागली होती… तरी नेट रनरेटमध्ये ते पुढे असल्यामुळे त्यांनी उपांत्य फेरी गाठली. आज त्यांनी टॉस जिंकताच कोणताही विचार न करता फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या संघातही बदल केला नाही. ओस्मान सादत आणि खलीद अहमदझाई यांनी 53 धावांची सलामी दिली. तसेच दोघांनी तिशीचा टप्पा ओलांडत अफगाणिस्तानला चांगली सलामी दिली. मात्र अफगाणिस्तानच्या डावात जान आणली ती फैझल आणि उझैरुल्लाहने. दोघांनी हिंदुस्थानी आक्रमणाला सडेतोड उत्तर देत मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने धाव घेतली. फैझलने 93 चेंडूंत 15 चौकारांसह 110 धावा केल्या तर दीडशतकी भागी केल्यानंतर तो बाद झाला. मग उझैरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत अपेक्षित त्रिशतकी टप्पा गाठला. त्याने डावाच्या शेवटच्या षटकांत आपले शतकही साकारले. अफगाणिस्तानच्या फलंदाजांना तीनशेच्या आत रोखण्यात हिंदुस्थानी गोलंदाजांना यश लाभले नाही. दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी दोन विकेट टिपले.
अॅरोन जॉर्जचा शतकी धमाका
कर्णधार बाद झाल्यानंतर अॅरोन जॉर्जने विहान मल्होत्राच्या साथीत विजयाच्या दिशेने कूच केली. या दोघांनी तिसऱया विकेटसाठी 80 चेंडूंत 90 धावांची भागीदारी करीत हिदुस्थानला तीनशे धावांचा टप्पा गाठून दिला. मात्र विजयासाठी 11 धावांची गरज असताना अॅरोनने वाहिदुल्लाह झदरानच्या गोलंदाजीवर बदली खेळाडू नाझीफुल्लाह अमिरीकडे झेल दिला. त्याने 104 चेंडूंत 15 चौकार व 2 षटकारांसह आपली 115 धावांची मॅचविनिंग खेळी सजविली. शेवटी विहानने वेदांत त्रिवेदीच्या (नाबाद 5) साथीत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याने 38 धावांच्या नाबाद खेळीत 47 चेंडूंना सामोरे जाताना 3 चौकार लगावले.




























































