#INDvBAN ऐतिहासिक ‘गुलाबी’ कसोटीपूर्वी रवी शास्त्रींचे होमहवन

2088

टीम इंडिया आणि बांगलादेश संघात 22 नोव्हेंबरपासून कोलकातातील ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर डे-नाईट कसोटी सामना सुरू होणार आहे. पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया आणि बीसीसीआय सज्ज आहे. बीसीसीआयचा नवनिर्वाचित अध्यक्ष व ‘बंगालचा टायगर’ नावाने प्रसिद्घ असणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने या कसोटीसाठी खास तयारी केली आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडूचा सामना करणार असल्याने कसोटीपूर्वी सरावाचेही आयोजन करण्यात आले आहे. टीम इंडियाचा संघ कसोटीपूर्वी सराव करण्यात मग्शूल असताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री उज्जैन येथे महाकालेश्वर मंदिरामध्ये होमहवन करताना दिसत आहेत.

रवी शास्त्री यांनी आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर होमहवन करतानाचा फोटो अपलोड केला आहे. टीम इंडियाचा संघ पहिल्यांदाच डे-नाईट कसोटी खेळत असून गुलाबी चेंडूचा सामना टीम इंडियाने यशस्वीपणे करावा यासाठी शास्त्री यांनी ही पूजा केल्याचे बोलले जात आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे रवी शास्त्री यांच्यासोबत टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरूण हे देखील दिसत आहेत.


View this post on Instagram

Mahakaleshwar Jyotirlinga Temple – ॐ नमः शिवाय

A post shared by Ravi Shastri (@ravishastriofficial) on

मालिका विजयासाठी सज्ज
टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये दुसरा कसोटी सामना कोलकातामध्ये खेळला जाणार आहे. इंदूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने पाहुण्या संघाचा 1 डाव आणि 130 धावांनी धुव्वा उडवला होता. मयांक अग्रवालचे द्विशतक, पुजारा-रहाणेचे अर्धशतक आणि शमी, इशांत, यादव या वेगवान त्रिकुटाची धारधार गोलंदाजी व जाडेजा-अश्विनच्या फिरकीच्या जोरावर यजमानांनी आरामात बाजी मारली होती. आता कोलकातात होणारा सामना गुलाबी चेंडूने असणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच डे-नाईट सामना खेळणार आहेत. त्यामुळे येथे बाजू मारून मालिका विजय मिळवण्यासाठी विराटसेना शर्थ करताना दिसेल.

आपली प्रतिक्रिया द्या