सुपर ओव्हर टायनंतर हिंदुस्थानचा विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधी 213 धावांच्या जबरदस्त आव्हानाची अफगाणिस्तानने बरोबरी साधली. मग अफगाणिस्तानने सुपर ओव्हरमध्ये 17 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानला दिले आणि हिंदुस्थानही विजयी धाव घेऊ न शकल्यामुळे सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली. त्यानंतर अफगाणिस्तानने हिंदुस्थानचे 2 फलंदाज 11 धावांतच बाद केल्यामुळे सामन्यात अफगाणींचे पारडे जड वाटत होते. पण रवी बिष्णोईच्या फिरकीने 3 चेंडूंतच अफगाणिस्तानचा खेळ खल्लास करताना दोन विकेट टिपले आणि हिंदुस्थानची अफगाणिस्तानविरुद्धची विजयाची मालिका अखंडित राखली. हिंदुस्थानने 3 सामन्यांच्या मालिकेतही निर्भेळ यश संपादले.

हिंदुस्थानच्या 213 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने गुलबदिन नईबच्या 23 चेंडूंतील 55 धावांच्या खेळीने सामना बरोबरीत सोडवला होता. या सामन्यात अफगाणच्या रहमतुल्लाह गुरबाज आणि कर्णधार इब्राहिम झदरान यांच्या अर्धशतकी खेळींमुळे संघाला दणदणीत सुरुवात करून दिली होती. त्यामुळे अफगाणी संघाला इतक्या मोठय़ा धावसंख्येचा पाठलाग करण्याचे बळ लाभले.

त्याआधी गेल्या दोन सामन्यांत पहिल्याच चेंडूंवर बाद झालेल्या रोहित शर्माने रिंकू सिंगच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 190 धावांची अभेद्य विश्वविक्रमी भागी रचत हिंदुस्थानला 212 अशी अभूतपूर्व धावसंख्या रचून दिली. रोहितने पाचवे विक्रमी शतक आणि शेवटच्या षटकांत विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱया 36 धावा फटकावत तिसऱया टी-20 सामन्यात विश्वविक्रमांची बरसात केली.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी, पण तो वगळता हिंदुस्थानचे चार आघाडीवीर 22 धावांतच धारातीर्थी पडले. अफगाणच्या फरीद अहमदने यशस्वी जैसवाल (4)आणि विराट कोहलीला (0) सलग चेंडूवर बाद करत खळबळ माजवली आणि पुढच्याच षटकांत संजू सॅमसनलाही (0) शून्यावर बाद करत हिंदुस्थानची 4 बाद 22 अशी दुर्दशा केली. गेल्या दोन्ही सामन्यांत नाबाद अर्धशतके झळकावणारा शिवम दुबे एकच धाव करू शकला. या बिकट अवस्थेत हिंदुस्थानला रोहित आणि रिंकूने सावरले.

दोन आरएसची विश्वविक्रमी भागी
4 बाद 22 अशा केविलवाण्या अवस्थेतून रोहित-रिंकूने संघाला सावरले. दोघेही सावध फलंदाजी करत होते. त्यामुळे हिंदुस्थानने 15 षटकांत 109 धावा केल्या होत्या, पण पुढील पाच षटकांत 22, 13, 10, 22, 36 असा 103 धावांचा पाऊस पाडत दोघांनी संघाला अनपेक्षितपणे 212 धावांपर्यंत नेले. या झंझावातात त्यांनी नेपाळच्या कुशल मल्ला-दीपेंद्र सिंग ऐरीच्या 145 धावांच्या विश्वविक्रमी भागीला सहज मागे टाकले. रोहितने 63 व्या चेंडूवर आपले पाचवे शतक झळकावत सूर्यकुमार आणि ग्लेन मॅक्सवेलच्या चार शतकांच्या विक्रमालाही मागे टाकले. 47 चेंडूंत 55 धावा करणाऱया रोहितने 22 चेंडूंत 66 धावा चोपून काढल्या. त्याने आपल्या 69 चेंडूंच्या खेळीत 8 षटकार आणि 11 चौकार हाणले, तर रिंकूनेही 39 चेंडूंत 6 षटकार आणि 2 चौकार मारताना नाबाद 69 धावा फटकावल्या.

रोहित-रिंकूची विश्वविक्रमी फटकेबाजी
रोहित शर्मा आणि रिंकू सिंहने शेवटच्या षटकात पाच षटकार आणि एक चौकार ठोकत 36 धावा काढत एका षटकात सर्वाधिक धावांच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली. रोहितने चौकार, मग नो बॉलवर षटकार, नंतर फ्री हिटवर षटकार खेचला आणि एकेरी धाव काढत रिंकूला स्ट्राइक दिली. त्यानंतर रिंकूने सलग तीन षटकार खेचत 36 धावा ठोकत युवराज सिंग आणि कायरन पोलॉर्डच्या एका षटकातील सर्वाधिक 36 धावांच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली. मात्र या दोघांनी सलग सहा षटकार ठोकत 36 धावा केल्या होत्या तर रोहित-रिंकूने सात चेंडूंच्या षटकांत 36 धावा काढल्या.