
ऑस्ट्रेलियात क्रिकेट सुरू असताना ‘अॅशेस’च्या चर्चेनं बाकी सगळय़ांवर पाणी फिरवलंय, पण ही हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका काही क्षुल्लक नाही. मालिकेचा स्कोअर 1-1 असा रंगात आला आहे आणि आता उरलेल्या दोन सामन्यांवर सोन्याची झुंज ठरणार आहे. समुद्रकाठच्या या लढतीत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. कुणाची बॅट तळपतेय आणि कुणाचे चेंडू घातक ठरतात, ते कळेलच.
होबार्टमध्ये हिंदुस्थानने दाखवलेली फलंदाजी म्हणजे जणू फटाक्यांची आतषबाजीच होती. तिलक वर्मा वगळता प्रत्येक फलंदाजाने स्ट्राइक रेट 125 च्या वर ठेवला. वॉशिंग्टन सुंदरने शक्तिशाली फटकेबाजी करत सामना संपवला आणि जितेश शर्माने आत्मविश्वासाने प्रतिस्पर्ध्यांचा खेळच बिघडवला.
ऑस्ट्रेलियासाठी टिम डेव्हिडचा 38 चेंडूंत 74 धावांचा तडाखा म्हणजे संघाच्या भविष्यातील टी-20 आराखडय़ाची झलक होती. पण मिच मार्श आणि मिच ओवन सलग बाद झाल्यानंतर त्यांचा डाव रुळावरून उतरला. तरी मार्कस स्टॉयनिसने 64 धावांची परिपक्व खेळी करून संघाची प्रतिष्ठा राखली.
आता लक्ष दोन खेळाडूंवर आहे, एक डावखुरा वेगवान बेन ड्वारशुईस आणि हिंदुस्थानचा वादळवीर अभिषेक शर्मा. ड्वारशुईस ऑस्ट्रेलियाच्या डावखुऱया वेगवान आघाडीचा पुढचा चेहरा ठरू शकतो, तर अभिषेक 39 धावा केल्यास विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी करून सर्वात वेगवान हजार धावा करणारा फलंदाज ठरेल, तेही सर्वांत कमी चेंडूंमध्ये!
ग्लेन मॅक्सवेल दुखापतीतून बरा होऊन आत परत येणार आणि हेडच्या गैरहजेरीत मॅट शॉर्ट पुन्हा ओपनिंगला दिसेल. दुसरीकडे, हिंदुस्थानकडून नितीश रेड्डीची पुनरागमनाची शक्यता आहे. कारण प्रशिक्षक मॉर्ने मोर्पेलनं त्याच्या फिटनेसला हिरवा पंदील दाखवला आहे. तिसरा सामना पावसामुळे वाया गेल्यामुळे चौथ्या सामन्याची आणखी चुरस वाढलीय. ती धम्माल आणि फटकेबाजी उद्या दिसेल, याची खात्री आहे.




























































