
चार दिवस यजमान ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजविलेला तिसरा कसोटी क्रिकेट सामना वाचविण्यात अखेर हिंदुस्थानला यश आले. रवींद्र जाडेजा जायबंदी झालेला होता. रिषभ पंतच्याही अंगठय़ाला दुखापत झालेली. हनुमा विहारीच्या मांडीचा स्नायू दुखावला गेलेला. रविचंद्रन अश्विनही कमरेच्या दुखापतीने त्रस्त. अशा प्रतिकूल परिस्थितीतही हिंदुस्थानने सिडनी कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळविले. रिषभ पंतची झुंजार फलंदाजी आणि अश्विन-विहारी जोडीने ऑसी गोलंदाजांचा केलेला प्रतिकार ही अखेरच्या पाचव्या दिवसाची प्रमुख वैशिष्टय़े ठरली. दोन्ही डावांत दमदार फलंदाजी करणारा स्टिव्हन स्मिथ या कसोटीचा मानकरी ठरला. चार सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने ब्रिस्बेन कसोटीतील कामगिरीवरून या मालिकेचा फैसला होणार आहे.
रहाणे गेला… धस्स झाले…
हिंदुस्थानने चौथ्या दिवसाच्या 2 बाद 98 धावसंख्येवरून सोमवारी सकाळी दुसऱया डावात पुढे खेळायला सुरुवात केली. रद्दाड झालेल्या खेळपट्टीवर अजून 309 धावा करायच्या होत्या. त्यामुळे कर्णधार अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या जोडीवरच हिंदुस्थानची खरी मदार होती. मात्र नाथन लायनने अजिंक्य रहाणेला कालच्याच 4 धावांवर मॅथ्यू वेडकरवी झेलबाद केले अन् हिंदुस्थानी चाहत्यांच्या मनात धस्स झाले.
जखमी पंतचा हल्ला
भरवशाचा अजिंक्य रहाणे सकाळी दुसऱयाच षटकात बाद झाल्यानंतर पहिल्या डावात दुखापत झालेला रिषभ पंत फलंदाजीला आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र जखमी वाघाप्रमाणे चवताळलेल्या पंतने बचावात्मक पवित्रा न घेता ऑस्ट्रेलियन गोलंदाजावर प्रतिहल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाज गांगरले. पंतने मिळालेल्या दोन जिवदानाचा फायदा उठवत वनडे स्टाईल फलंदाजी करताना 118 चेंडूंत 12 चौकार व 3 षटकारांसह 97 धावांची खेळी केली. अवघ्या तीन धावांनी त्याचे हुकलेले शतक मनाला चटका लावून गेले. चेतेश्वर पुजाराने 205 चेंडूंच्या संयमी खेळीत 77 धावा करताना 12 चेंडू सीमापार पाठवले. जोश हेजलवूडने त्याला चकवून यष्टय़ांचा वेध घेतल्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
विहारी-अश्विन जोडीची कमाल
चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतरही हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियाच्या 43 षटकांचा प्रतिकार करायचा होता. हिंदुस्थानी चाहत्यांनी आशा सोडली होती. कारण रवींद्र जाडेजा जायबंदी होता. हनुमान विहारी व रविचंद्रन अश्विन ही जोडी खेळपट्टीवर आली. या जोडीने नांगर टाकून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले. या दोघांनी 259 चेंडूंचा सामना करत सहाव्या विकेटसाठी 62 धावांची अभेद्य भागीदारी करीत सिडनी कसोटी अनिर्णित राखण्यात निर्णायक भूमिका बजावली.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 338 धावा
हिंदुस्थान पहिला डाव – 244 धावा
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 6 बाद 312 (घोषित)
हिंदुस्थान दुसरा डाव – रोहित शर्मा झे. स्टार्वे गो. कमिन्स 52, शुभमन गिल झे. पेन गो. हेजलवूड 31, चेतेश्वर पुजारा त्रि.गो. हेजलवूड 77, अजिंक्य रहाणे झे. वेड गो. लायन 4, रिषभ पंत झे. कमिन्स गो. लायन 97, हनुमा विहारी नाबाद 23, रविचंद्रन अश्विन नाबाद 39.
अवांतर – 11, एकूण – 131 षटकांत 5 बाद 334 धावा.
गोलंदाजी – जोश हेजलवूड 26-12-39-2, पॅट कमिन्स 26-6-72-1, नाथन लायन 46-17-114-2.






























































