Aus vs Ind अश्विन पुन्हा चमकला, ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 65

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शनिवारपासून मेलबर्न इथे सुरुवात झाली.  पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव सहन केलेला हिंदुस्थानचा संघ अजिंक रहाणे याच्या नेतृत्वात मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  हिंदुस्थानी संघाने पहिल्या सत्रापासूनच ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या रविचंद्रन अश्विन याने दुसऱ्या सामन्यातही उत्तम गोलंदाजी करत 2 बळी टीपले. जसप्रीत बुमराह यानेही एक बळी टीपल्याने ऑस्ट्रेलियाने 65 धावांत 3 गडी गमावले होते.  हिंदुस्थानी संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्यासाठी ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत शर्थीचे प्रयत्न करताना दिसतोय.

हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाने या कसोटीसाठी संघात चार बदल केले आहेत. सलामीवीर शुभमन गिल, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा, यष्टिरक्षक रिषभ पंत व वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना अंतिम अकरा जणांच्या चमूत स्थान देण्यात आले आहे. शुभमन गिल व मोहम्मद सिराज यांचे कसोटी पदार्पण होणार आहे. दोन देशांमधील हा 100 वा सामना आहे.  या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ या कसोटीत विजय मिळवून मालिकेत झोकात पुनरागमन करतो का ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतोय याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले आहे.

पंत, जाडेजावरील जबाबदारी वाढणार

हिंदुस्थानचा संघ पाच फलंदाजांसह या कसोटी सामन्यात उतरत आहे. शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी या फलंदाजांवर टीम इंडियाला अवलंबून रहावे लागणार आहे. लोकेश राहुललाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे यष्टिरक्षक रिषभ पंत व अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा यांच्या खांद्यावरील जबाबदारी आणखीन वाढणार आहे. दोघांनाही फलंदाजीत ठसा उमटवावाच लागणार आहे. या दोघांसह रविचंद्रन अश्विनलाही फलंदाजीत चुणूक दाखवावी लागणार आहे.

हिंदुस्थानी संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरला

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटीत पाच गोलंदाजांसह रणांगणात उतरणार आहे. मोहम्मद शमीला दुखापतीमुळे मालिकेमधून माघार घ्यावी लागली आहे. आता त्याच्याऐवजी संघामध्ये मोहम्मद सिराजची निवड करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह व उमेश यादव यांच्यासह तो वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणार आहे. रविचंद्रन अश्विनसह रवींद्र जाडेजा या फिरकी गोलंदाजांलाही संघात स्थान देण्यात आले आहे.

साहाला वगळले

रिद्धीमान साहा या अनुभवी यष्टिरक्षकाला पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही डावांत त्याच्याकडून निराशा झाली. त्यामुळे रिषभ पंतला मेलबर्न कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. मागील ऑस्ट्रेलियन दौऱ्यात त्याने छान फलंदाजी केली होती. तसेच ऑस्ट्रेलियातील सराव सामन्यातही त्याने धडाकेबाज फलंदाजी केली होती.

उभय संघांमध्ये 100 वा कसोटी सामना

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया आतापर्यंत 99 कसोटी सामन्यांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यापैकी 43 सामने ऑस्ट्रेलियाने आणि 28 सामने हिंदुस्थानने जिंकले आहेत. एक लढत टाय झाली आहे. 2001 सालापर्यंत ऑस्ट्रेलिया 28-11 अशा फरकाने आघाडीवर होती, पण गेल्या 20 वर्षांमध्ये हिंदुस्थानने 17 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून त्यांना 15 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे.

उभय संघ खालीलप्रमाणे

हिंदुस्थान – शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे (कर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया – टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), जो बर्न्स, कॅमरून ग्रीन, मार्क्स हॅरीस, जोश हेझलवूड, ट्रेव्हीस हेड, मोयसेस हेनरीक्स, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मायकेल नेसर, जेम्स पॅट्टीनसन, स्टीवन स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड.