
>> द्वारकानाथ संझगिरी
डोळे आनंदाश्रूने डबडबलेले आहेत. एका डोळ्यात आनंद ओसंडून वाहतोय. दुसऱया डोळ्यात बसलेला सुखद धक्का आहे. मध्येच चिमटा काढून मी मनाला विचारतोय, ‘आपण कसोटी सामना जिंकला?’ नुसती मॅच ड्रॉ झाली असती तरी नाचलो असतो.
माझ्या आयुष्यात हिंदुस्थानी क्रिकेटपटू लिहीत असलेली अनेक सोनेरी पानं पाहण्याचा किंवा ऐकण्याचा योग आला. मग तो इंग्लडमधला 1971चा विजय असो, 1983चं ते वर्ल्डकप जिंकणं किंवा मग पाकिस्तानात पाकिस्तानला हरवणं, कितीतरी. पण आजचा विजयसुद्धा त्याच दर्जाचा होता. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या विजयाने सर्वबाद 36 धावांच्या राखेतून जन्म घेतलाय. विजयाचं बाळ रांगता रांगता एकामागोमाग एक संकटं कोसळत गेली. या संघाकडे टायटानिकचं वैभव कधीच नव्हतं. पण सर्वबाद 36नंतर हिंदुस्थानी संघाकडे कुणी शिडाची बोट म्हणूनसुद्धा बघत नव्हतं. तरीही ती वादळात तरली. किनाऱयाला लागली. तेव्हा त्या घोंघावणाऱया लाटांचं संगीत अंगाला अधिक गोड वाटायला लागलं. वास्को दी गामाचं धैर्य आणि चिकाटी या हिंदुस्थानी संघाने दाखवली.
मागे वळून पाहताना आपल्याला असं लक्षात येतं की, या कसोटीत जवळपास नव्या संघाचंच उद्घाटन कर्णधार राहणेने केलं होतं. जवळपास फिट असलेले 11 जण खेळले आणि त्याला आपण संघ म्हटला.
अशा परिस्थितीतसुद्धा हिंदुस्थानी संघ 5 गोलंदाजांनी खेळला आणि ते योग्यच झालं. कारण पाचही गोलंदाजांचा कसोटी अनुभव हा जेमतेम 4 कसोटींचा होता. त्यामुळे नुसत्या 4 गोलंदाजांवर खेळून काही होणार नव्हतं म्हणून पाचवा गोलंदाज घेतला गेला. ते सर्वच जवळपास नवेकोरे होते. एक-दोनच एकदा एकदाच घडी उघडलेल्या कपडय़ांसारखे! त्यांनी या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे 20 बळी घेतले. दुसऱया डावात ऑस्ट्रेलिया कधी डाव घोषित करणार यावर चर्चा होत होती. हिंदुस्थानी गोलंदाजांना ती चर्चा झोंबली असली पाहिजे. त्यांनी सरळ ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारत ऑलआऊट केलं.
त्यानंतर धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानी संघासमोर आव्हान काही सोपं नव्हतं. गोलंदाजी दर्जेदार होती. खेळपट्टी वारंवार खोडय़ा काढत होती. मध्येच चेंडू उसळायचा, मध्येच तो खाली जायचा. नेथन लायनचा चेंडू हातभर वळायचा. तर कधी सरळ जायचा. नेथन लायनचा चेंडू एकदा तर विकेटकिपरला चुकवून थेट स्लिपमध्ये गेला. पण महत्त्वाची गोष्ट अशी होती की, अशा खेळपट्टीवरसुद्धा आणि दर्जेदार गोलंदाजीसमोरसुद्धा हिंदुस्थानी संघाची जिंकण्याची जिद्द कधी कमी झाली नाही. स्लिपमध्ये गेलेल्या त्या चेंडूनंतर पुढे सरसावत रिषभ पंतने नेथन लायनला षटकार ठोकला. आज मी दादा आहे हे त्याला दाखवायचे होते. तो चूक करून जर बाद झाला असता तर आपण त्याचे वाभाडे काढले असते. पण यश बऱयाचदा अशाच जोखमीतून जन्म घेतं. ही पाखराची ज्योतीवर उडी होती. पण इथे ज्योत विझली. पाखरू जिवंत राहिलं. शुभमन गिलने 91 धावांची खेळी करून विजयाच्या ताजमहालाची बैठक तयार केली आणि लंचनंतर रहाणेने स्वतःकडे आक्रमक भूमिका घेतली. पुजाराला त्याने तंबू ठोकायला लावला. रहाणे मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. पंतच्या रक्तात बजावात्मक पेशी फार कमी असल्या तरी त्यांच्यावर त्याने थोडंफार काम सोपवलं. पण कधी संधी उत्पन्न करताना त्याच्या त्या आक्रमक पेशी उसळायच्या. अशा फलंदाजांना नेहमीच सुदैवाचा पांढरा घोडा मिळतो. कारण दैवाला ठाऊक असतं की, हा परिकथेतला राजपुत्र आहे आणि त्याला राजकन्या जिंकायची आहे. पण तितकीच महत्त्वाची भूमिका ही पुजाराची होती. ती त्याने एखाद्या अशोक कुमारप्रमाणे अत्यंत सुंदरपणे रंगवली.
ऑस्ट्रेलियाला आधी नॅथन लायन जिंकून देईल असं वाटत होतं. पण पुजारा-पंत यांनी बचाव आणि आक्रमणाचा सुरेख संयम आपल्या खेळात दाखवला आणि ते मनसुबे हाणून पाडले. त्याचबरोबर डाव्या, उजव्या हाताच्या फलंदाजांमुळे त्याला वांरवार चेंडूची दिशा बदलावी लागली. नंतर त्यांची मदार होती नव्या चेंडूवर. नव्या चेंडूवर त्यांना पुजाराची विकेटसुद्धा मिळाली. ती षटकं या मॅचच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. पॅट कमिन्सची गोलंदाजी सर्वात जास्त धोकादायक वाटत होती. त्याने पंतसाठी तीन स्लिप, गली लावले आणि चेंडूचा टप्पा खोलवर ठेवला. डावपेच चुकीचा नव्हता. पंत ड्राइव्ह करताना स्लिपमध्ये झेल देईल ही त्यांची अपेक्षा होती. कदाचित ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी चेंडू जास्तच खोलवर टाकले. त्यामुळे पंतला ड्राइव्हस् करायला सुवर्णसंधी मिळाली. ती त्याने सोडली नाही. त्याने अप्रतिम कव्हर ड्राइव्हस् आणि ऑफ ड्राइव्हस् मारले. हे पंतचे जे आव्हान स्वीकारणं होतं ना, ते मला आवडलं. तिथे पुन्हा त्याने एक गोष्ट सिद्ध केली, आम्ही मॅच जिंकायला आलेले आहोत. आम्हाला मॅच ड्रॉ करायची नाहीये. त्याला साथ वॉशिंग्टन सुंदरने दिली. वॉशिंग्टन सुंदर अशी बॅटिंग करत होता की, कमीत कमी 10 कसोटी सामने त्याच्या खिशात आहेत आणि तो 11वा खेळतोय.
गंमत पहा, ही मॅच कसोटी म्हणून खेळली गेली. नंतर हिची वनडे झाली आणि शेवटी शेवटी टी-ट्वेंटी झाली. तिन्ही प्रकारची फलंदाजी यात पाहायला मिळाली. पुजाराने कसोटीत कशी बॅटिंग करावी याचं प्रात्यक्षित दाखवलं. गिलने कसोटीत खेळताना वनडेचा कसा उपयोग होतो हेपण दाखवलं. पंतने तर वनडे आणि टी-ट्वेंटी या दोन्ही फॉरमॅटचा टेस्टमध्ये कसा उपयोग करायचा याचं प्रात्यक्षिक दाखवलं अन् हिंदुस्थानी संघ सामना जिंकला.
मला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी जाणवते ती या नव्या खेळाडूंचा पेशन्स, त्यांची जिद्द, त्यांचा निर्धार आणि त्याच्यासाठी त्यांचं कौतुक किती करावं ते कमीच आहे. एका बाबतीत मी अजिंक्य रहाणेचं कौतुक करीन की, अजिंक्य रहाणेने त्या सर्वांना प्रचंड कॉन्फिडन्स दिला. अजिंक्य रहाणे असा माणूस आहे की, ज्याच्याकडे कुठलाही नवखा फलदांज जाऊन आपलं मन व्यक्त करतो. हीच गोष्ट अजिंक्य रहाणेने या वेळी केली असावी.
एक विचार करा, अख्या हिंदुस्थानी गोलंदाजीचा अनुभव होता 4 कसोटीचा आणि तरीही त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजीला दोनदा बाद केलं. मला एक गोष्ट मान्य आहे, गेल्या 50 वर्षांतली ही अशक्त ऑस्ट्रेलियन फलंदाजी आहे… अशी ऑस्ट्रेलियन फलंदाजी मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेली नाही. तरीसुद्धा आपल्या गोलंदाजांचं कौतुक कमी होत नाही. कारण यांच्याकडे तरी कुठे अनुभव होता. मी तुलना करत नाही; पण शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या समोर केवढं प्रचंड आव्हान होतं… एका बाजूला आदिलशाही होती, दुसऱया बाजूला मोगल होते. शिवाजी महाराजांनी सामान्य माणसातून, मावळ्यांमधून सैन्य उभं केलं. ते मावळे बघता बघता भाले झाले. हिंदुस्थानी संघाच्या बाबतीतही तेच झालं. हे खेळाडू बघता बघता भाले झाले आणि त्यांच्या तीक्ष्ण घावांनी ऑस्ट्रेलियन संघ कोसळला. हिंदुस्थानी संघाने आग्य्राहून नुसती सुटका नाही केली तर हिंदुस्थानी संघ आग्रा जिंकूनच परतला.
हा विजय सर्व हिंदुस्थानींच्या लक्षात राहील! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन
हिंदुस्थानने चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाकर मिळविलेल्या जोरदार विजयाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे व टीमचे अभिनंदन केले आहे. गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्कात मिळालेला हा विजय सर्व हिंदुस्थानींच्या लक्षात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजयी संघाचे कौतुक केले. पहिल्या कसोटी सामन्यात पराभक पत्करावा लागल्यानंतरदेखील हिंदुस्थानी संघानं दुर्दम्य आशावाद आणि जिद्द याच्या जोरावर संपूर्ण कसोटी मालिका जिंकली. धाकांचा यशस्की पाठलाग करताना हिंदुस्थानी संघानं या मालिकेत नवीन विक्रम प्रस्थापीत केला ही देशातील सर्क क्रिकेटवीरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.