पहिल्या कसोटीवर हिंदुस्थानची पकड, बांगलादेशपुढे विजयासाठी 513 धावांचे कठीण लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलदेशात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीवर हिंदुस्थानने आपली पकड मजबूत केली असून विजयाच्या दिशने वाटचाल सुरू केली आहे. हिंदस्थानने बांगलादेशपुढे विजयासाठी 513 धावांचे कठीण आव्हान ठेवले आहे. तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेश बिनबाद 42 धावांवर खेळत होता.

बांगलादेशच्या फलंदाजांना पहिल्या डावामध्ये फारशी चांगली फलंदाजी करता आली नाही. बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांमध्ये हिंदुस्थानी गोलंदाजींनी गुंडाळला. कुलदीप यादवने 40 धावांत अर्धा संघ गारद केला. मोहम्मद सिराजने 20 धावा देत तीन विकेट घेतले. उमेश यादव, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट टिपला.

बांगलादेशचा डाव 150 धावांवर आटोपल्यानंतर टीम इंडियाने फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार राहुल आणि शुभमन गिल जोडीने पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर गिल आणि चेतेश्वर पुजारा जोडीने शतकी खेळी साकारले. गिलने 110 तर पुजाराने नाबाद 102 धावा केल्या.

गिलचे कसोटीतील पहिलेवहिले शतक

शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमधील त्याचे पहिले शतक झळकावले. त्याने 152 चेंडूंत 110 धावा करताना 10 चौकार आणि 3 षटकार लगावले. शतकानंतर गिल वेगाने धावा बनवण्याच्या प्रयत्नात मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला.

खडतर तीन वर्षांनंतर पुजाराच्या पदरात यश

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात हिंदुस्थानचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याचा शतकाचा दुष्काळ अखेर संपला. 2019नंतर पुजाराने झळकावलेलं हे पहिलं शतक आहे. दुसऱ्या डावात पुजाराने 130 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीने नाबाद 102 धावा फटकावल्या. पुजाराने शतक पूर्ण करताच हिंदुस्थानने 258 धावांवर डाव घोषित केला. पुजाराने 52 इनिंगनंतर शतक झळकावले आहे. कसोटी कारकिर्दीतील हे त्याचे 19वे शतक आहे. पुजाराने 2019 साली सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकले होते.