
लोकेश राहुलचे धडाकेबाज शतक (129 धावा) व रोहीत शर्माच्या दमदार 83 धावांच्या खेळीनंतर हिंदुस्थानसाठी दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात रिषभ पंत (37 धावा) व रवींंद्र जाडेजा (40 धावा) यांनी मोलाची कामगिरी बजावली. दोघांच्या महत्त्कपूर्ण खेळींमुळे टीम इंडियाला 364 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अॅण्डरसनने 62 धावांत टीम इंडियाचा निम्मा संघ गारद केला.
हिंदुस्थानने 3 बाद 276 या धावसंख्येवरून शुक्रवारी पुढे खेळायला सुरूवात केली. पण टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. लोकेश राहुल 129 धावांवर बाद झाला. त्यानंतर रिषभ पंत व रवींंद्र जाडेजा यांनी कडवी झुंज दिली. पण तळाच्या फलंदाजांना खेळपट्टीवर उभे राहता आले नाही. जेम्स ऍण्डरसनने पाच, ओली रॉबीनसन व मार्क कूड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोईन अलीने एक फलंदाज बाद केला. कसोटीच्या एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी टिपण्याची जेम्स अॅण्डरसनची ही 31वी खेप ठरलीय.
दरम्यान, अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने दुसऱया दिवशी पहिल्या डावात 2 बाद 28 धावा केल्या होत्या. मोहम्मद सिराजने डॉम सिबली (11 धावा) व हसीब हमीद (0) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.






























































