
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी अवघं क्रिकेटविश्व उत्सुक असतं. या दोन संघात द्वीपक्षीय मालिका केव्हा होणार हा प्रश्न विचारणाऱ्यांना बीसीसीआयच्या FTP (Future Tour Program) मधून उत्तर मिळालं आहे. गेल्या 10 वर्षांत या दोन्ही संघात द्वीपक्षीय मालिका झाली नसून 2027 पर्यंत या दोन संघात कोणतीही द्वीपक्षीय मालिका खेळवण्यात येणार नाहीये. क्रिकेट बोर्डाने सगळ्या राज्य संघटनांना 2023-2027 या काळासाठी भविष्यातील मालिकांचा कार्यक्रम पाठवला आहे. यामध्ये हिंदुस्थान पाकिस्तानसोबत एकही मालिका खेळणार नसल्याचं दिसून आलं आहे. हिंदुस्थानी संघ सर्वाधिक सामने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरोधात खेळणार आहे.
2023-2027 या कालावधीमध्ये हिंदुस्थानी क्रिकेट संघ 38 कसोटी सामने खेळणार आहे. यामधले 20 सामने हे हिंदुस्थानात खेळवण्यात येणार आहेत, तर 18 सामने विदेशात खेळवण्यात येणार आहेत. पुढील 5 वर्षांत 42 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार असून यातले 21 सामने हे मायदेशात आणि 21 सामने विदेशात खेळवण्यात येणार आहेत. पुढच्या 5 वर्षांत हिंदुस्थानी संघ T20सामने अधिक खेळणार असून 31 सामने हे हिंदुस्थानात तर 30 सामने विदेशात खेळवण्यात येणार आहेत.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्या द्वीपक्षीय मालिका ही 2012-2013 साली खेळवण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानचा संघ हिंदुस्थानात आला होता. 3 एकदिवसीय सामने आणि दोन T20 सामन्यांची ही मालिका होती. यातील एकदिवसीय सामन्यांची मालिका पाकिस्ताने 2-1 ने जिंकली होती तर T20 मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला होता. या मालिकेनंतर उभय संघांमध्ये एकही मालिका झालेली नाहीये.





























































