नाही म्हणजे नाही, लिजेंड्स लीगमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास हिंदुस्थानचा पुन्हा नकार

अतिरेकी कारवायांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला जगाच्या पाठीवर उघडे करण्यासाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघाने बहिष्काराचे अस्र उपसले आहे. माजी क्रिकेटपटूंच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स टी-20 स्पर्धेच्या उपांत्य लढतीतही हिंदुस्थानने आपला पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. या कृतीमुळे पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला, तर हिंदुस्थानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

या स्पर्धेसाठी स्पॉन्सर असलेल्या इज माय ट्रिप या कंपनीनेही ‘आधी देश मग व्यापार,’ अशा आशयाची सोशल मीडियावर पोस्ट करीत हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यानच्या उपांत्य लढतीतून माघार घेतली आहे. या कंपनीने आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर लिहिले की, ‘आम्ही हिंदुस्थानी संघाच्या भूमिकेचे समर्थन करतोय. दहशतवादी कारवायांचे समर्थन होऊ शकत नाही. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानशी न खेळण्याचा पवित्रा घेत आपल्या देशाचा सन्मान वाढविला आहे. काही गोष्टी या खेळापेक्षाही मोठय़ा असतात. ‘दहशतवाद आणि क्रिकेट’ एकत्र चालू शकत नाही. दहशतवादी कारवायांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला अशीच वागणूक द्यायला हवी. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी या स्पर्धेत 20 जुलैलाही पाकिस्तानविरुद्धच्या गटफेरीतील सामन्यावरही बहिष्कार घातला होता. आता उपांत्य लढतीवरही बहिष्कार घालून आम्ही स्पर्धेतून बाद होऊ, पण अतिरेकी कारवायांचे केंद्र असलेल्या पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही, या भूमिकेवर ठाम राहत देशप्रेमाचा दृढ संकल्प क्रिकेटजगतापुढे ठेवला आहे.

आशिया चषकातील लढतीलाही विरोध

आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक 26 जुलैला जाहीर झाले अन् तेव्हापासून या स्पर्धेतही पाकिस्तानविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार घाला, अशी मागणी हिंदुस्थानात जोर धरू लागली आहे. पहलगामवरील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढल्याने त्याचे पडसाद आता उभय देशांमधील क्रिकेट सामन्यावरही पडू लागले आहेत.