
रोहीत शर्माने घेतलेला निर्णय त्याच्याच अंगलट आल्याचे चित्र हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाले.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियासाठी के. एल. राहुल तारणहार ठरला. त्याने ठोकलेल्या शतकामुळे हिंदुस्थानला 245 ही आव्हानात्मक धावसंख्या उभी करता आली. त्यानंतर गोलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी भेदक मारा करायला सुरुवात केली. मोहम्मद सिराजने चौथ्याच षटकात एडम मार्करमला बाद करत हिंदुस्थानला यश मिळवून दिले. 1 बाद 11 अशी दक्षिण आफ्रिकेची बिकट अवस्था झाली होती. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीचा सामना करत दक्षिण आफ्रिकेने लंच पर्यंत डाव सावरला. लंचच्यावेळी दक्षिण आफ्रिका 1 बाद 49 अशा बिकट अवस्थेत होती.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज चांगल्या लयीत दिसत होते. मोहम्मद सिराजने 5 षटके टाकत दक्षिण आफ्रिकेचा एक गडी बाद केला होता. त्याच्या जोडीला जसप्रीत बुमराहदेखील अचुक मारा करत होता आणि त्याने फक्त सहा षटके टाकली होती. लंचनंतर रोहीत शर्मा मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या अनुभवी गोलंदाजांकडून सुरुवात करेल, असे वाटले होते.
रोहीतने चुकीचा निर्णय घेतला..
लंचनंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देत रोहीत शर्माने शार्दुल ठाकूर आणि प्रसिध कृष्णा यांच्यावर विश्वास दाखवला. खेळ सुरु झाला आणि गोलंदाजीची धुरा आता शार्दुल ठाकुर आणि प्रसिध कृष्णा यांच्याकडे होती. पण रोहीत शर्माने घेतलेला हा निर्णय त्याच्याच अंगलट आल्याचे चित्र पहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डीन एल्गर शार्दुल आणि प्रसिधवर चांगलाच तुटून पडला. एल्गरने संयमी खेळ करत वेगात आपले शथक पुर्ण केले आणि दक्षिण आफ्रिकेने एकही विकेट न गमवता थेट शतकाचा पल्ला गाठला. त्यामुळे लयीत असलेल्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला विश्रांती देण्याचा रोहीत शर्माच्या निर्णयामुळे हिंदुस्थानची या सामन्यावरील पकड ढिली झाली.

























































