
दक्षिण आफ्रिकेने तब्बल 25 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदुस्थानमध्ये कसोटी मालिका जिंकून ऐतिहासिक कामगिरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. अद्यापही 522 धावांची प्रचंड आघाडी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यात विजयासाठी केवळ 8 फलंदाज बाद करायचे आहेत. दुसरीकडे क्लीन स्वीपच्या पराभवाचे संकट ओढावलेल्या यजमान हिंदुस्थानी संघावर उद्या दिवसभर फलंदाजी करण्याचे अवघड आव्हान असेल.
दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या 548 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानची मंगळवारी उर्वरित 15.5 षटकांच्या खेळात 2 बाद 27 अशी दुर्दशा झाली. चैथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा साई सुदर्शन 2, तर ‘रात्रीचा रखवालदार’ म्हणून आलेला कुलदीप यादव 4 धावांवर खेळत होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानी सलामीवीर काहीच प्रभाव पाडू शकले नाहीत. जान्सनच्या पहिल्याच षटकात जैस्वाल अडचणीत सापडला आणि अखेर कट शॉटवर यष्टीमागे काईल व्हेरेनकरवी झेलबाद झाला. राहुलने 30 चेंडूंत 6 धावा करत बचावात्मक खेळ सुरू ठेवला, परंतु हार्मरच्या जादुई चेंडूवर त्याच्या यष्टय़ा उद्ध्वस्त झाल्या. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असलेल्या हिंदुस्थानवर आता 12 वर्षांत दुसऱयांदा घरच्या मैदानावर व्हाईट वॉशच्या नामुष्कीचे काळेकुट्ट ढग जमा झाले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 5 बाद 260 धावांवर घोषित
दक्षिण आफ्रिकेने 489 धावसंख्या उभारल्यानंतर हिंदुस्थानला 201 धावांवर गुंडाळून पहिल्या डावात 288 धावांची मोठी आघाडी घेतली.



























































