हिंदुस्थान-विंडीजची आजपासून कसोटी, टीम इंडिया सज्ज

409

हिंदुस्थान-वेस्ट इंडीज यांच्यामध्ये गुरुवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यावेळी वन डे व ट्वेण्टी-20 मालिका जिंकणारा हिंदुस्थानचा संघ कसोटी मालिका जिंकून वेस्ट इंडीजमध्ये निर्भेळ यश संपादन करण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल. हिंदुस्थान-वेस्ट इंडीज यांच्यामध्ये होणारी कसोटी मालिका ही ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’अंतर्गत होणार असल्यामुळे दोन्ही संघांमध्ये रोमहर्षक लढत पाहायला मिळेल यात शंका नाही. याप्रसंगी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसमोर संघनिवडीचे आव्हान असणार आहे. तसेच त्याची एक नजर वैयक्तिक विक्रमांकडे असेल यात वाद नाही. तसेच आयसीसीच्या नव्या नियमानुसार दोन्ही संघांतील खेळाडूंच्या जर्सीमागे क्रमांक व नाव असणार आहे.

– पहिल्या कसोटीत टीम इंडियाच्या अंतिम अकरामध्ये कोणाला संधी मिळेल याचे उत्तर गुरुवारीच मिळणार आहे. मयांक अग्रवालसोबत सलामीला लोकेश राहुल येईल की हनुमा विहारी हे अद्याप निश्चित झालेले नाही. हिंदुस्थान संघव्यवस्थापनाने पाच गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला, तर रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे यांच्यापैकी एकालाच अंतिम अकरामध्ये संधी मिळेल.

– खेळपट्टी पाहून हिंदुस्थानचे संघव्यवस्थापन पाच गोलंदाज खेळवायचे की चार गोलंदाज याबाबत निर्णय घेतील. तीन वेगवान गोलंदाज खेळवायचा निर्णय घेतल्यास जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा व मोहम्मद शमी हे गोलंदाज निश्चित अंतिम अकरामध्ये असतील. चार गोलंदाजांसह मैदानात उतरल्यास रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव यांच्यापैकी एकालाच चान्स मिळेल.

वेस्ट इंडीजमध्ये दोन मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी कसोटी मालिकेआधी क्रिकेटपासून दूर अँटिग्वामधील जॉली बीचवर असा निवांत क्षण घालवला.

आपली प्रतिक्रिया द्या