
हिंदुस्थानने जगाला युद्ध नव्हे, बुद्ध दिला, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्र महासभेत संपूर्ण जगाला हिंदुस्थानच्या महान परंपरेची आठवण करून दिली. हिंदुस्थानने शांतीचा संदेश दिला आहे. दहशतवादाविरोधात आवाज उठवण्यामागे हेच कारण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचे नाव न घेता त्यांनी इम्रान खान यांच्या उपस्थितीत हा टोला लगावला.
दहशतवाद संपवण्याचा निर्धार करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर याविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. ह्युस्टनच्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत दहशतवादाविरोधात एल्गार केल्यानंतर शुक्रवारी त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करतानाही ठोस भूमिका मांडली. दहशतवाद हे केवळ एका देशापुढील नव्हे तर संपूर्ण जगापुढील एक मोठे आव्हान बनले आहे. या वाढत्या दहशतवादाविरोधात सर्वांनी एकजुटीने उभे राहूया, असे आवाहन त्यांनी केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यांची या प्रश्नाविरोधात लढण्यासाठी एकजूट नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. दहशतवादाविरोधात एकजूट नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेमागील तत्त्वांना हा एक धक्काच आहे, असे ते म्हणाले.
गांधीजी, विवेकानंदांची तत्त्वे आजही मार्गदर्शक
हिंदुस्थानची संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे. या संस्कृतीच्या परंपरा आजही जपल्या जाताहेत. लोकांच्या सहभागातून लोकांचे कल्याण हे आमचे मूळ तत्त्व आहे, असे सांगतानाच मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वांना उजाळा दिला. गांधीजींचा सत्य आणि अहिंसेचा संदेश आजही संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहे असे मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच नमूद केले. शंभर वर्षांपूर्वी महान आध्यात्मिक गुरू स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये धर्म संसदेत जगाला सौहार्द आणि शांतीचा संदेश दिला होता. जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीचा आजही आंतरराष्ट्रीय समुदायाला हाच संदेश राहील, असेही मोदी म्हणाले.
‘सबका साथ, सबका विकास’
मोदी यांनी हिंदुस्थानच्या विकासाकडेही आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हीच आमची प्रेरणा आहे. आम्ही 130 कोटी हिंदुस्थानींना डोळ्यांसमोर ठेवून प्रयत्न करतोय. परंतु हे प्रयत्न ज्या स्वप्नांसाठी केले जाताहेत ती स्वप्ने संपूर्ण जगाची आहेत, असे मोदी यांनी सांगितले. 2022मध्ये हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील तोपर्यंत सरकार गोरगरीबांसाठी आणखी 2 कोटी घरे बांधणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.























































