
नागपूर कसोटीप्रमाणेच राजधानी नवी दिल्लीतील दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा अडीच दिवसांतच खेळ खल्लास झाला. रवींद्र जाडेजा व रविचंद्रन अश्विन या जोडगोळीने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन फलंदाजांची फिरकी घेतली. जाडेजाने 7 विकेट घेत कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली, तर अश्विनला 3 विकेट मिळाल्यो. त्यामुळे हिंदुस्थानने तिसऱया दिवशीच अगदी आरामात दुसरी कसोटी 6 विकेट राखून जिंकली. याचबरोबर यजमानांनी चार सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. अष्टपैलू कामगिरी करणारा जाडेजा या कसोटीचा मानकरी ठरला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावसंख्या उभारल्यानंतर हिंदुस्थानला 262 धावांवर रोखून एका धावेच्या फरकाने निसटती आघाडी घेण्यात यश मिळविले. त्यामुळे ही कसोटी अतिशय चुरशीची होणार असा अंदाज होता, मात्र तिसऱया दिवशी जाडेजा-अश्विन या फिरकीच्या जोडगोळीने कमाल केली अन् कांगांरूंची 113 धावांवरच दाणादाण उडविली. पहिल्या डावातील एका धावेच्या आघाडीमुळे हिंदुस्थानला विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य मिळाले. यजमानांनी केवळ 26.4 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 118 धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
जड्डूची जादू!
ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी तंबूत परतल्यानंतर जाडेजा अर्थात जड्डूची जादू सुरू झाली. त्याने उर्वरित 5 बळींपैकी चार जणांचे दांडके उडविले. केवळ पीटर हॅण्डस्कोम्बला (0) त्याने कोहलीकरवी झेलबाद केले. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स (0), अॅलेक्स पॅरी (7), नाथन लॉयन (8) व मॅथ्यू कुहनेमन (0) यांचे जाडेजाने त्रिफळे उडवून ऑस्ट्रेलियाचं होत्याचं नव्हतं करून टाकलं. मोहम्मद शमीला केवळ 2, तर अक्षर पटेलला एक षटक मिळाले. जाडेजा-अश्विन जोडीने इतर गोलंदाजांना मोर्चावर येण्याची संधीच दिली नाही.
लोकेश राहुल दुसऱया डावातही फेल
ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 115 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानचा लोकेश राहुल दुसऱया डावातही फेल झाला. त्याला एका धावेवर नाथन लॉयनने यष्टीमागे पॅरीकरवी झेलबाद केले. पहिली विकेट 6 धावांवर पडल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आक्रमक भूमिका घेतली. त्याने 20 चेंडूंत 31 धावा करताना 3 चौकार आणि 2 षटकार मारले. धावबाद झाल्याने त्याचे अर्धशतक हुकले. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी 2 बाद 39 धावांवरून हिंदुस्थानला 69 धावांपर्यंत नेले. 31 चेंडूंत 20 धावा केल्यानंतर कोहलीला टॉड मर्फीने यष्टीचीत केले. यानंतर श्रेयस अय्यर 6 धावा करून लॉयनचा दुसरा बळी ठरला. मग पुजारा (नाबाद 31) आणि के. एस. भरत (नाबाद 23) यांनी हिंदुस्थानच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
ऑस्ट्रेलियाने 52 धावांत 9 फलंदाज गमावले
त्याआधी ऑस्ट्रेलियाने दुसऱया दिवसाच्या 1 बाद 61 धावसंख्येवरून रविवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली, मात्र जाडेजा-अश्विन जोडीने 18.1 षटकांत उर्वरित 9 फलंदाज केवळ 52 धावांत बाद करून अवघ्या 31.1 षटकांत 113 धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपविला. पहिल्या सत्रातच ट्रव्हिस हेड (43), स्टीव्ह स्मिथ (9) व मार्नस लाबुशेन (35) ही आघाडीची फळी माघारी परतली. रविचंद्रन अश्विनने हेडला यष्टीमागे भरतकरवी झेलबाद केले, तर स्मिथला पायचीत पकडले. त्यानंतर रवींद्र जाडेजाने एका अप्रतिम चेंडूवर लाबुशेनची दांडी गुल केली. डेव्हिड वॉर्नर जायबंदी झाल्याने त्याच्या जागेवर फलंदाजीला आलेला मॅट रेनशॉला (2) अश्विनने पायचीत पकडून हिंदुस्थानला चौथे यश मिळवून दिले.





























































