
यजमान हिंदुस्थानने आशिया चषक हॉकी स्पर्धेतील ‘अ’ गटाच्या अखेरच्या लढतीत कझाकिस्तानवर 15-0 गोलफरकाने विक्रम विजय मिळविला. आधीच सुपर फोरममध्ये दाखल झालेल्या हिंदुस्थानने विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. मलेशियाने चिनी तैपेईवर 15-0 अशा विक्रमी गोलफरकाने विजय मिळविल्यानंतर हिंदुस्थानने काही वेळातच या विक्रमाची पुनरावृत्ती करताना कझाकिस्तानचा धुव्वा उडविला.
हिंदुस्थानकडून अभिषेकने (5वा, 8वा, 20वा आणि 59वा मिनिट) सर्वाधिक चार गोल ठोकले. त्याने हे चारही मैदानी गोल केले. सुखजीत सिंहने गोलांची हॅट्ट्रिक (15वा, 32वा, 38वा मिनिट -फिल्ड गोल) केली व जुगराज सिंहने (24वा -पेनल्टी कॉर्नर), 31वा (पेनल्टी स्ट्रोक) दोन गोल केले. याचबरोबर अमित रोहिदास (29वा मिनिट, पेनल्टी कॉर्नर), हरमनप्रीत सिंह (26वा मिनिट,पेनल्टी कॉर्नर), राजिंदर सिंह (32वा मिनिट, फिल्ड गोल), संजय (54वा मिनिट, पेनल्टी कॉर्नर), दिलप्रीत सिंह (55वा मिनिट (फिल्ड गोल) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
हिंदुस्थानचे आक्रमण इतके जबरदस्त होते की दुबळ्या कझाकिस्तानच्या खेळाडूंना ना बचाव करता आला ना आक्रमण. सलग तिसऱ्या पराभवानिशी कझाकचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यांना चीनविरुद्ध 13-1 तर जपानविरुद्ध 7-0 असा मानहानीकारक पराभव सहन करावा लागला होता. आता सुपर फोरममध्ये हिंदुस्थान हा कोरिया, मलेशिया आणि चीनविरुद्ध प्रत्येकी एक-एक सामना खेळेल.