
हिंदुस्थानने २०२८ मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक हवामान बदल परिषदेचे (COP33) यजमानपद भूषवण्याचा आपला प्रस्ताव मागे घेतला आहे. ‘आज तक’ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. वृत्तानुसार, जागतिक हवामान मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हिंदुस्थानने स्वतः या आयोजनासाठी आपली दावेदारी मांडली होती, त्यामुळे या माघारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये दुबई येथे पार पडलेल्या ‘COP28’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून २०२८ च्या परिषदेचे यजमानपद हिंदुस्थानला मिळावे, असा प्रस्ताव मांडला होता. मात्र आता यातून माघार घेण्यात आली आहे.
‘आज तक’च्या वृत्तानुसार, हिंदुस्थानने संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थांना आपण यजमानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याचे अधिकृतपणे कळवले आहे. मात्र हा निर्णय घेण्यामागची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या घडामोडीवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, तसेच बॉन येथील ‘COP’ मुख्यालयाकडूनही या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.


























































