
पहिलीच कसोटी आणि पहिलाच डाव खेळत असलेल्या शुभा सतीशने पदार्पणातच 69 धावांची झंझावाती खेळी आणि जेमिमा रॉड्रिग्जबरोबर केलेल्या शतकी भागीने हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत जबरदस्त शुभारंभ करून दिला. दोघीनंतर हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा यांच्याही जोरदार खेळ्यांनी हिंदुस्थानला पहिल्या दिवशी 7 बाद 410 धावांचा डोंगर उभारून दिला. हिंदुस्थानी महिला क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवसात 400 पेक्षा अधिक धावा करून नवा विक्रम प्रस्थापित केला. आजच्या या खेळामुळे हिंदुस्थानी महिला कसोटी क्रिकेटमध्ये ‘शुभ दिन आयो रे चा’च माहौल होता.
हिंदुस्थानच्या दौऱयावर असलेल्या इंग्लंडने तीन टी-20 सामन्यांची मालिका जिंकून महिला संघाला हादरवले होते. मात्र कसोटीत महिलांनी इंग्लंड संघाला दाखवून दिले ‘हम किसीसे कम नहीं.’ कर्णधार हरमनप्रीत 49 धावांवर दुर्दैवी ठरली नसती तर आज हिंदुस्थानचा पाच खेळाडूंनी अर्धशतके साजरी केली असती. पण शुभा (69), जेमिमा (68), यास्तिका (66) आणि दीप्ती (नाबाद 60) या चौघींनीही धावांची साठी गाठत हिंदुस्थानला 410 धावा उभारून दिल्या. कसोटीत एका दिवसात इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत 88 वर्षांपूर्वी 4 बाद 431 धावा केल्या होत्या. तो काळ वेगळा होता. त्या कसोटीनंतर एकही संघ एकदाही दिवसभरात 400 धावा करू शकला नव्हता. सारेच संघ साडेतीनशेच्या आसपास धावा करायच्या, पण हिंदुस्थानी आधुनिक क्रिकेटमधील सर्वोच्च धावांचा नवा विक्रम रचला.
हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली, पण स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या दोघींनीही घोर निराशा केली. या दोघीही संघाच्या धावफलकावर पन्नाशीसुद्धा लागली नव्हती आणि दोघीही तंबूत परतल्या होत्या.
अर्धशतके आणि शतकी भागी
47 धावांत सलामीवीर बाद झाल्यावर कसोटीत पदार्पण करणाऱया शुभा सतीश आणि जेमिमा रॉड्रिग्जने कमाल केली. कसोटीचा कोणताही अनुभव नसताना या दोघींनीही इंग्लिश गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडले. शुभा तर भलत्याच वेगात होती. जेमिमानेही तिला सुरेख साथ दिली. शुभाने आपले पहिले अर्धशतक 49 चेंडूंत ठोकले. हे कसोटीतील तिसरे वेगवान अर्धशतक ठरले. वेगवान अर्धशतकाचा विक्रम हिंदुस्थानच्याच संगीता डबीरच्या नावावर असून तिने 40 चेंडूंत पराक्रम केला होती. तसेच इंग्लंडच्या नॅटसिव्हर ब्रंटने 48 चेंडूंत पन्नाशी गाठली आहे. शुभा आणि जेमिमाने तिसऱया विकेटसाठी 115 धावांची भागी रचली. पदार्पणातच अर्धशतक झळकावून दोघीही बाद झाल्या. त्यानंतर हरमनप्रीत काwर आणि यास्तिका भाटियाने 116 धावांची भागी केली. हरमन 49 धावांवर धावचीत झाली, पण यास्तिकाने 66 धावा केल्या. पुढे दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा (30) यांनी सातव्या विकेटसाठी 92 धावांची भागी रचत संघाला चारशेचा टप्पा ओलांडून दिला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दीप्ती 60 धावांवर तर पूजा वस्त्रकार 4 धावांवर खेळत होती.




























































