‘टीम इंडिया’ने इभ्रत राखली,  अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ने तिसऱया आणि अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 13 धावांनी पराभव करून किमान इभ्रत राखण्यात यश मिळविले. यजमान ऑस्ट्रेलियाने ही तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका 2-1 फरकाने जिंकली असली तरी हिंदुस्थानने शेवट गोड करून आपल्या चाहत्यांना दिलासा दिला. मोक्याच्या वेळी 92 धावांची वादळी खेळी करणारा हार्दिक पांडय़ा या सामन्याचा मानकरी ठरला. याचबरोबर पहिल्या दोन सामन्यांत दणकेबाज शतके ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा स्टिवन स्मिथ ‘मालिकावीर’ किताबाचा मानकरी ठरला.  

 ‘टीम इंडिया’ची अडखळती सुरुवात

दरम्यान, विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी घेतली. मात्र, शिखर धवन (16) व शुभमन गिल (33) हे ‘टीम इंडिया’ला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले. धवनने 27 चेंडूंत 2 चौकारांसह 16 धावा केल्या. शॉन अॅबॉटने सहाव्या षटकात त्याला अॅश्टन अॅगरकरवी झेलबाद करून ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर आलेला विराट कोहली व शुभमन गिल यांनी दुसऱया विकेटसाठी 56 धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अॅश्टन अॅगरने शुभमन गिलला पायचीत बाद करून जोडी फोडली.

मधली फळी पुन्हा अपयशी

विराट कोहली एका बाजूने किल्ला लढवतअसताना श्रेयस अय्यर (19) व लोकेश राहुल (5) हे मधल्या फळीतील फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले. अॅडम झम्पाने श्रेयसला मार्नस लॅबूस्चगनेकरवी झेलबाद केले, तर राहुलला एगरने पायचीत पकडले. मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्याने हिंदुस्थानचा डाव 25.3 षटकांत 4 बाद 123 असा संकटात सापडला. कोहलीने 78 चेंडूत 63 धावा फटकावताना 5 चेंडू सीमापार पाठविले. जोश हेजलवुडने त्याला यष्टीमागे पॅरीकरवी झेलबाद करून ऑस्ट्रेलियाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला.

पांडय़ा-जाडेजाची फटकेबाजी

हिंदुस्थानची 32 षटकांत 5 बाद 152 अशी स्थिती झालेली असताना हार्दिक पांडय़ा व रवींद्र जाडेजा फलंदाजीला आले. या दोघांनी उर्वरित 18 षटकांत 150 धावांची अभेद्य भागीदारी करून हिंदुस्थानला 5 बाद 302 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. हार्दिकने 76 चेंडूंत 7 चौकार व एका षटकारासह 92 धावा फटकावल्या. जाडेजाने 50 चेंडूंत 66 धावा चोपून काढताना 5 चौकारांसह 3 टोलेजंग षटकार लगावले. ऑस्ट्रेलियाकडून अॅश्टन अॅगरन 2, तर जोश हेझलवूड, शॉन अॅबॉट व अॅडम झाम्पा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

नटराजनचे पदार्पण

तिसऱया आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ‘टीम इंडिया’ने चार बदल केले. मयांक अग्रवाल, नवदीप सैनी, मोहम्मद शमी व युझवेंद्र चहल यांना बाहेर करून टी. नटराजन, शुभमन गिल, शार्दुल ठापूर व कुलदीप यादव यांना खेळविण्यात आले. या लढतीतून नटराजनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  

कोहलीने मोडला सचिनचा आणखी एक विक्रम

विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 12 हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम केला. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे जमा होता. सचिनने 309 व्या वन-डेत 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. विराटने 251 व्या सामन्यात ही कामगिरी करुन सचिनचा विक्रम मोडला. विराट कोहलीने 242 व्या डावात ही कामगिरी करून दाखवली. सचिन तेंडुलकरने 300 डावांमध्ये 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. याआधी दुसऱया एकदिवसीय सामन्यात विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 हजार धावांचा टप्पा पूर्ण करत सचिनचाच विक्रम मोडला होता.

या आकडेवारीवर एक नजर

रवींद्र जाडेजा व हार्दिक पांडय़ा या जोडीने सहाव्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी करीत विक्रम रचला. सहाव्या विकेटसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली.

विराट कोहलीने या वर्षी एकही वन डे शतक झळकावले नाही. 2008 सालानंतर पहिल्यांदाच असे घडले. 2008 सालामध्ये त्याने पदार्पण केले होते. या वर्षी त्याला शतक झळकवता आले नाही. या वर्षी कोरोनामुळे हिंदुस्थानचा संघ कमी सामने खेळलाय. त्यामुळे विराट कोहली या वर्षी शतकापासून दूर राहिला.

ऑस्ट्रेलियाचा संघ पॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे पहिल्यांदाच पराभूत झाला. याआधी या संघाने येथे चार वन डे, एक कसोटी व एक टी-20 सामना जिंकला होता. तसेच हिंदुस्थानच्या संघाला येथे पहिल्यांदाच विजय मिळवता आला आहे. याआधी श्रीलंका व ऑस्ट्रेलियाकडून हिंदुस्थानला या स्टेडियममध्ये हार सहन करावी लागली होती.

बदली गोलंदाजांनी कांगारूंना रोखले

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 303 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 49.3 षटकांत 289 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या दोन सामन्यांत हिंदुस्थानी गोलंदाजांना निष्प्रभ ठरविणाऱया ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना तिसऱया लढतीत बदली गोलंदाजांनी रोखले. कर्णधार अॅरोन पिंच (75) व ग्लेन मॅक्सवेल (59) वगळता इतर फलंदाजांना जखडून ठेवण्यात हिंदुस्थानचे नव्या दमाचे गोलंदाज यशस्वी ठरले. टी. नटराजनने सहाव्या षटकात मार्नस लॅबुशेनचा (7) त्रिफळा उडवून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्याच्या जागेवर आलेल्या स्टीवन स्मिथला (7) शार्दुल ठापूरने यष्टीमागे राहुलकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला बहुमोल यश मिळवून दिले. त्यानंतर मोयसेस हेनरीक्स (22), पदार्पणवीर पॅमेरून ग्रीन (21), एलेक्स पॅरी (38) हे मधल्या फळीतील फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेल्याने पारडे हिंदुस्थानच्या बाजूने झुकले. ग्लेन मॅक्सवेलने 38 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांसह 59 धावा फटकावून सामन्यात रंगत निर्माण केली होती.