नितेशपाठोपाठ सुमितही सुवर्णवीर

बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानच्या तीन खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला, पण नितेश कुमारलाच सुवर्ण जिंकता आले होते. मात्र भालाफेकीत सुमित अंतिलने सोनेरी कामगिरी करत हिंदुस्थानला तिसरे सुवर्णही जिंकून दिले. आज बॅडमिंटनने पाचव्या दिवशी चार पदकांची कमाई करत धम्माल उडवली तर भालाफेकीत सुमित अंतिलने टोकियो पॅरालिम्पिकच्या सोनेरी यशाची पुनरावृत्ती करण्याचा इतिहासही रचला. त्याने 70.59 मीटर भालाफेक केली. गेल्या चार दिवसात 7 पदके जिंकणाऱया हिंदुस्थानने आज दोन सुवर्णांसह सात पदके जिंकत पदकतालिकेत चौदाव्या स्थानी झेप घेतली.

बॅडमिंटनमध्ये आज हिंदुस्थानकडून सहा पदकांची अपेक्षा होती, पण चारच पदके जिंकता आली, तर कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानला अपेक्षित यश मिळवता आले नाही. नितेश कुमारने सुवर्ण जिंकण्याची किमया साधली, पण त्याच्या पराक्रमाची पुनरावृत्ती मुरुगेसन आणि यथिराज या दोघांनीही करता आली नाही. अन्यथा आज हिंदुस्थानने बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदकांची अनोखी हॅटट्रिक साजरी केली असती.
15 वर्षांपूर्वी विशाखापट्टणम येथे झालेल्या एका रेल्वे अपघातात नितेशला आपला डावा पाय गमवावा लागला होता. नितेशने पाय गमावला, मात्र जगण्याची जिद्द गमावली नाही. फुटबॉलच्या प्रेमात असलेला नितेश या अपघातामुळेच बॅडमिंटनपटू ठरला आणि अखेर आज त्याने आपल्या स्वप्नांना यशाची सोनेरी किनार लावली. काल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी हिंदुस्थानसाठी बॅडमिंटनने धमाकेदार खेळ केला आणि पाच पदकांच्या लढाईत झेप घेतली. त्यात नितेशने अंतिम फेरी गाठत आपले पदक निश्चित केले होते. बेथेलविरुद्धच्या अंतिम सामना हृदयाचे ठोके चुकवणारा ठरला. नितेशने पहिला गेम 21-14 असा जिंकून जोरदार सुरुवात केली, पण दुसऱया गेममध्ये बेथेलने सामन्यात पुनरागमन करताना 21-18 अशी बाजी मारली. त्यामुळे सुवर्ण पदकाची निश्चिती तिसऱया गेमपर्यंत लांबली. तिसरा गेमही थरारक झाला. जेतेपदासाठी दोघांमध्ये अटीतटीचा संघर्ष झाला. बेथेलनेही 21-20 अशी आघाडी घेत जेतेपदाच्या गुणाच्या दिशेने झेप घेतली होती, पण त्याचा शॉट नेटवर लागला आणि पुढे नितेशने त्याचा प्रतिकार 23-21 असा मोडीत काढला.

सोन्याची तहान रौप्य पदकावर
नितेशच्या यशानंतर थुलीसिमथी आणि सुहास यथिराजकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पण कियु झिया यांगने मुरुगेसनला 21-10, 21-17 असे सहज पराभूत केले, तर लुकास मझूरने सुहास यथिराजचा 21-9, 21-13 असा फडशा पाडला. त्यामुळे हिंदुस्थानच्या दोन सुवर्ण पदकांना रौप्य पदक जिंकून परतावे लागले. यथिराजने गेल्या टोकियो स्पर्धेतही रौप्य पदक जिंकले होते.

शीतल-राकेशला तिरंदाजीत कांस्य
शीतल देवी आणि राकेश कुमार या तिरंदाजांना उपांत्य सामन्यात इराणच्या तिरंदाजाकडून हार पत्करावी लागली. त्यानंतर या जोडीने मिश्र दुहेरी टीम पंपाऊंड गटात इटलीच्या एलोनोरा सारती आणि मातेओ बोनासिना जोडीचा 156-155 असा पराभव करत कांस्य पदक काबीज केले. तीन वर्षांपूर्वी हरविंदर सिंगने हिंदुस्थानला तिरंदाजीत पहिले पदक जिंकून दिले होते, तर आज मिश्र दुहेरीत दुसऱया पदकावर आपले नाव नोंदवले.

कथुनियाचे सुवर्ण हुकले
हिंदुस्थानच्या योगेश कथुनियाला थाळीफेकीत पुन्हा एकदा रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. टोकियो पॅरालिम्पिकमध्येही तो रौप्य पदकाचा मानकरी ठरला होता. आज त्याने मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 42.22 मीटर लांब थाळीफेक केली. मात्र सुवर्ण पदकावर सलग तिसऱयांदा शिक्कामोर्तब करणाऱया ब्राझीलच्या क्लॉडनी बटिस्टा दोस सांतोसने आपल्या पाचव्या प्रयत्नात 46.86 ही फेक केली. विशेष म्हणजे, थाळीफेकीच्या एफ 56 श्रेणीत त्याच्याच नावावर विश्वविक्रमाची नोंद आहे.

निशादची रौप्य उंच उडी
निशादने उंच उडीत रौप्य पदकाला गवसणी घालत हिंदुस्थानच्या पदक तालिकेत दुसऱया रौप्याची नोंद केली होती. त्याने 2.04 मीटर उंच उडी मारत या रौप्य पदकावर आपला हक्क दाखवला. अमेरिकेचा रॉडरिक टाऊनसेंड 2.12 मीटर उंच उडी घेत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.

दोन कांस्यही हुकली
बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीच्या एसएच 6 श्रेणीत सोलाईमलाई शिवराजन आणि सुमथी सिवन या दोघांना कांस्य लढतीत इंडोनेशियाच्या सुभान आणि रिना मार्लिना जोडीकडून 21-17, 21-12 अशी हार सहन करावी लागली. तर या पराभवामुळे हिंदुस्थानचे बॅडमिंटनचे कांस्य थोडक्यात हुकले. पुरुष एकेरीच्या एलएल 4 श्रेणीत सुकांत कदमला इंडोनेशियन फ्रेंडी सेतिआवानने 21-17, 21-18 अशा चुरशीच्या लढतीत नमवले. त्यामुळे बॅडमिंटनमध्ये दोन कांस्य पदके गमवावी लागली.

प्रीती पालची विक्रमी धाव
100 मीटर शर्यतीत कांस्य जिंकणाऱया प्रीती पालने 200 मीटर शर्यतीतही तीच कामगिरी करत एका पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याचा पराक्रम रचला. ती ट्रक अॅण्ड फिल्ड प्रकारात एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिलीच अॅथलीट ठरली आहे. तसेच पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात एकापेक्षा अधिक पदके जिंकणारी ती सातवीच हिंदुस्थानी खेळाडूही ठरली आहे.

पॅरिस पॅरालिम्पिक पदक तालिका
क्र. देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 चीन 42 29 14 85
2 ब्रिटन 29 14 10 53
3 अमेरिका 13 18 10 41
4 ब्राझिल 11 7 17 35
5 फ्रान्स 10 10 13 33
6 ऑस्ंट्रेलिया 8 8 12 28
7 इटली 8 7 13 28
8 नेदरलॅण्डस् 7 3 4 14
9 उझबेकिस्तान 6 4 4 14
10 युव्रेन 5 12 16 33
11 स्पेन 5 4 12 21
12 स्वित्झर्लंड 4 1 2 7
13 जपान 3 5 7 15
14 हिंदुस्थान 3 5 6 14
15 तुकाa 3 5 2 10
16 थायलंड 3 4 6 13