हिंदुस्थानच्या शत्रूंची तंतरणार! हवाई दलात स्वदेशी बनावटीचं ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या हवाई दलात सोमवारी स्वदेशी बनावटीचं ‘प्रचंड’ हे हलक्या वजनाचं लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झालं आहे. या हेलिकॉप्टर्सची निर्मिती हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने केली आहे. राजस्थानमधील जोधपूर येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या 10 हेलिकॉप्टरची पहिली तुकडी हवाई दलात सामील झाली आहे.

या हेलिकॉप्टर्सची संरचना जास्त उंचीच्या युद्धभूमींसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि चीनच्या पर्वतीय परिसरांमध्ये गस्तीसाठी हे उपयुक्त ठरणार आहे. या हेलिकॉप्टर्सची रचना युद्धभूमींवरील येणाऱ्या आव्हानांच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे.

लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्समध्ये अनेक स्टील्थ फीचर्स असून, शस्त्रास्त्रांनी सज्ज अशी यंत्रणा आहे. अंधारात हल्ला करू शकणे, अपघातग्रस्त झाल्यास सुखरूप लँडिंग करणे अशी याची वैशिष्ट्य आहेत. तसंच ही हेलिकॉप्टर्स मल्टीरोल प्लॅटफॉर्म क्षेपणास्त्रं आणि अन्य हत्यारांच्या वापरांसाठी देखील सक्षम आहेत.

या हेलिकॉप्टर्सचं मुख्य लक्ष्य हे कॉम्बॅट सर्च अँड रेस्क्यु अर्थात प्रत्यक्ष युद्धावेळी आपल्या सैनिकांना शोधून त्यांना वाचवणं, पुन्हा सुखरूप सैन्यतळावर आणणं हे असणार आहे. याखेरीज शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेला संपूर्णतः नेस्तनाबूत करणं, उंचावर असलेले शत्रूचे बंकर उद्ध्वस्त करणं हेही या हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून शक्य होणार आहे.

हे हेलिकॉप्टर दोन पायलट्सच्या मदतीन उडतं. या हेलिकॉप्टरची लांबी 51.10 फूट इतकी आहे. सलग सव्वा तीन तास हे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकतं. विशेष म्हणजे जिथ लढाऊ विमानंही पोहोचू शकत नाहीत, अशा दुर्गम ठिकाणी हे हेलिकॉप्टर उडू शकणार आहे. लढाऊ विमानांपेक्षा कमी वेग असल्याने लक्ष्याचा अचूक वेध आणि अधिक घातक हल्ला करण्यास ही हेलिकॉप्टर्स सक्षम आहेत.