
महिलांना लष्करात स्थायी कमिशन देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे पुढचे पाऊल पडले आहे. यासाठी लष्कराने नियुक्तीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. महिला अधिकार्यांच्या छाननीसाठी विशेष नंबर-5 निवड मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे लष्करात महिलांना स्थायी कमिशनचा हक्क मिळणार आहे.
शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 14 वर्षे सेवा देणार्या पुरुष जवानांनाच लष्करात कायम कमिशनचा पर्याय उपलब्ध होता. हा हक्क महिलांनाही देण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये दिला. त्या आदेशाचे पालन करीत संरक्षण मंत्रालयाने गेल्या महिन्यात महिलांनाही स्थायी कमिशन देण्याचा आदेश जारी केला. त्या अनुषंगाने लष्कराने पुढील कार्यवाहीला गती दिली आहे. हवाई दल आणि नौदलात महिला अधिकार्यांना आधीपासूनच हा हक्क मिळत आहे. आता लष्कराच्या सर्व दहाही विभागात महिलांना स्थायी कमिशन मिळणार आहे.






















































