
सामना ऑनलाईन । ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलियामधील वेगवान खेळपट्टयांवर खेळणे अवघड असते. त्यातच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्यांच्या उंचीचाही फायदा मिळणार आहे. मात्र, हिंदुस्थानी फलंदाज प्रतिकार करण्यासाठी सज्ज आहेत, असा इशारा ‘टीमइंडिया’चा स्फोटक फलंदाज रोहित शर्माने प्रतिस्पर्धी संघाला दिलाय.
हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलिया दौरा 21 नोव्हेंबरला ब्रिसबेनमध्ये पहिल्या टी-20 सामन्याने सुरू होणार आहे. रोहित म्हणाला, पर्थ आणि ब्रिसबेन मैदानावर आम्ही बऱयाचदा खेळलोय. दोन्ही मैदानावर खेळणे आव्हानात्मक असते. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठविण्यास ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा हातखंडा आहे. त्यामुळे फलंदाजी करताना आमची खरी कसोटी लागणार आहे.




























































