
गव्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून, दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांतील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. दरम्यान, कोल्हापूर शहराच्या वेशीवर पश्चिमेलगत गावात तीन रानगवे मूळ अधिवास चुकल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून अजूनही भटकत फिरत आहेत. या गव्यांना त्यांच्या मूळ अधिवासात परतविण्यास वन विभागाला अपयश आले आहे.
सौरभ संभाजी खोत (वय 21, रा. भुयेवाडी, ता. करवीर) असे मृताचे नाव असून, प्रल्हाद पाटील (वय 48) आणि शुभम पाटील (वय 20) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी रात्री भुयेवाडी परिसरात गव्याचे अस्तित्व दिसून आले. वडणगे येथून राजाराम बंधारा परिसरातील शेतातून तो भुयेवाडीत आल्याचे समजताच त्याला हुसकाविण्यासाठी गावातील काही ग्रामस्थांनी हातात बॅटरी घेऊन गव्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिधरलेला हा गवा आक्रमक झाला. गव्याने केलेल्या हल्ल्यात गावातील माजी उपसरपंचाचा मुलगा सौरभ खोत जागीच ठार झाला, तर इतर दोघे जखमी झाले.
दरम्यान, भुयेवाडी गावात गवा दाखल झाल्याचे समजताच वन विभाग व पोलीस पथक तातडीने या ठिकाणी दाखल झाले. गवा पुन्हा आक्रमक होऊन अन्य कोणावर हल्ला करू नये, यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू होते. मात्र, उसाच्या शेतात लपलेला गवा अंधारामुळे दिसून येत नव्हता. आज दिवसभर गव्याचा शोध घेऊन त्याला त्याच्या मूळ अधिवासात परतविण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता.




























































